मौजमस्तीसाठी मुलगा गोव्याला निघाला, मात्र पोलिसांमुळे माघारी फिरला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST2021-02-05T05:51:53+5:302021-02-05T05:51:53+5:30

जळगाव : आई-वडिलांना न सांगता बालकाने रेल्वेचे तिकीट आरक्षित करून कर्नाटक येथून मौजमस्तीसाठी गोव्याकडे निघाला. मात्र, चुकीच्या गाडीत ...

The boy left for Goa for fun, but was turned away by the police. | मौजमस्तीसाठी मुलगा गोव्याला निघाला, मात्र पोलिसांमुळे माघारी फिरला..

मौजमस्तीसाठी मुलगा गोव्याला निघाला, मात्र पोलिसांमुळे माघारी फिरला..

जळगाव : आई-वडिलांना न सांगता बालकाने रेल्वेचे तिकीट आरक्षित करून कर्नाटक येथून मौजमस्तीसाठी गोव्याकडे निघाला. मात्र, चुकीच्या गाडीत बसल्यामुळे तिकीट निरीक्षकांनी या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या १५ वर्षीय मुलाच्या डोक्यातील गोव्याचे खूळ काढून त्याला पालकांच्या स्वाधीन केल्याची घटना नुकतीच जळगाव स्टेशनवर घडली.

आकाश मेहता (नाव बदललेले) असे या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तो कर्नाटक राज्यातील हुबळी येथे आई-वडिलांसोबत राहत आहे. इयत्ता आठवीत आणि अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या आकाशवर मात्र मित्रांच्या वाईट संगतीचा परिणाम झाला. या संगतीतून आकाश थेट मौजमस्तीसाठी गोव्याकडे निघाला. शाळेतील मित्र कारने गोव्याला गेले, मात्र आकाशकडे पैसे नसल्याने त्याने तिकीट आरक्षित करून गोव्याकडे निघाला होता. परंतु, चुकीच्या गाडीत बसल्यामुळे गाडीतील तिकीट निरीक्षकांनी आकाशला हटकले. त्याची चौकशी करून हा प्रकार रेल्वेच्या पोलीस नियंत्रण कक्षाला कळविला.

मात्र, तोपर्यंत गोरखपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी भुसा‌वळहून निघून गेली होती. या गाडीला जळगावलाही थांबा नसल्यामुळे, थेट मनमाडला थांबणार होती. मात्र, जळगाव रेल्वे पोलिसांनी या मुलाच्या सुरक्षेचा विचार करून, थांबा नसलेल्या या गाडीला पाचोरा येथे थांबविले. पाचोरा रेल्वे पोलिसांच्या मदतीने या मुलाला जळगावात आणले.

इन्फो

मुलगा सापडल्याच्या आनंदाने वडिलांना अश्रू अनावर

अभ्यासात अत्यंत हुशार आणि एकुलता एक असलेला आकाश घरातून अचानक गायब झाल्यामुळे वडील चिंतातुर झाले होते. पोलिसातही तक्रार दिली होती. मात्र, गोव्याला जाणाऱ्या आकाशला जळगाव रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजल्यानंतर वडील दुसऱ्याच दिवशी जळगावात दाखल झाले. आकाश सापडल्याचे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते.

इन्फो :

आकाशची समजूत काढून पुन्हा पाठविले कर्नाटकला

आकाशला ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कर्नाटकहून आई-वडील येईपर्यंत समतोल प्रकल्पाच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव यांच्या मदतीने रात्रभर जिल्हा निरीक्षणगृहात ठेवले होते. दुसऱ्या दिवशी वडील जळगावात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चयनसिंग पटेल व सपना श्रीवास्तव यांनी आकाशला अभ्यासाकडे लक्ष देण्याचे सांगितले. तसेच गोव्याला जाऊन फिरण्याचे, मौजमस्ती करण्याचे त्याच्या डोक्यातील खूळ काढून पुन्हा आनंदाने वडिलांसोबत कर्नाटकला पाठविले. आकाशनेही या पुढे असे कृत्य न करण्याचे आश्वासन रेल्वे पोलिसांना दिले.

Web Title: The boy left for Goa for fun, but was turned away by the police.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.