लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, त्यांची धावपळ वाढून या कामाचे विकेंद्रीकरण व्हावे, यासाठी तालुकास्तरावर दिव्यांग बोर्ड सुरू करण्याचे शासन आदेश असतानाही जिल्ह्यात मात्र, डॉक्टरांअभावी ही यंत्रणा कार्यान्वित होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. यंदाही सर्वच ताण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर येणार असून याच ठिकाणी गर्दी वाढणार आहे. तालुकास्तरावर दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक असता मात्र, जिल्ह्यात २१ पैकी २० पदे रिक्त असल्याने ही मोठी अडचण यात समोर आली आहे.
गेल्या वर्षी नॉन कोविड यंत्रणा बंद राहिल्याने वर्षभरातून केवळ दोनच महिने दिव्यांग बोर्ड सुरू राहिला. पुन्हा दुसऱ्या लाटेत तो बंद करण्यात आला. आता पुन्हा ही सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारपासून सुरू होणार आहे. मात्र, या ठिकाणी अचानक गर्दी वाढणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून कुपन सिस्टीम राबविली जाणार आहे. दरम्यान, दिव्यांग बोर्डाच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बैठक घेण्यात आली. यात सर्व नियोजन कसे असेल यावर चर्चा करण्यात आली. तसेच दिव्यांग बोर्डाच्या कक्षाचीही स्वच्छता करण्यात आली.
सात स्मरण पत्र
दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष मारोती पोटे यांनी तालुकास्तराव दिव्यांग बोर्ड सुरू करावे, जेणेकरून चाळीसगाव, रावेर, अमळनेर अशा दूरवरून येणाऱ्या दिव्यांगांना सोयीचे होईल, अशी मागणी करणारे सात पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांना दिले आहे. मात्र, मनुष्यबळाची कमतरता व यंत्रणा नसल्याने हे बोर्ड सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे डॉ.चव्हाण यांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय अधीक्षकांच्या जागा वर्षानुवर्षे खाली
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांच्या जागाच भरल्या जात नसून त्या वर्षानुवर्षे खालीच आहे. सध्यस्थितीत केवळ धरणगाव येथे एक वैद्यकीय अधीक्षक कार्यरत आहेत. शिवाय दिव्यांगांच्या तपासणीसाठी आवश्यक तज्ञ डॉक्टर स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने हे बोर्ड तालुकास्तरावर सुरू करण्यास अडचणी असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण वैद्यकीय यंत्रणेत केवळ एमबीबीएस व बीएएम डॉक्टरच असल्याने ही अडचण आहे.
अशी आहे स्थिती
१८ ग्रामीण रुग्णालय
३ उपजिल्हा रुग्णालय
वैद्यकीय अधीक्षक : केवळ १ धरणगाव