मतदार यादीच्या आॅनलाईन कामात सर्व्हरचा खोडा असल्याच्या बीएलओंनी मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:06 IST2017-11-24T20:05:40+5:302017-11-24T20:06:47+5:30
आॅनलाईनच काम करण्याच्या सक्तीमुळे अडचण

मतदार यादीच्या आॅनलाईन कामात सर्व्हरचा खोडा असल्याच्या बीएलओंनी मांडल्या व्यथा
जळगाव: मतदार यादीचे काम आॅनलाईन किंवा आॅफलाईन करण्याचा असलेला पर्याय रद्द करत सर्व बीएलओंना (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) आॅनलाईनच काम करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र आॅनलाईनच्या कामात सर्व्हर कनेक्ट न होण्यासह अनेक अडचणी उभ्या ठाकल्याने अडचणीत भर पडली आहे. शुक्रवारी जळगाव तालुक्यातील बीएलओंच्या झालेल्या आढावा बैठकीत या तक्रारींचा पाढाच तहसिलदारांसमोर वाचण्यात आला. त्यापैकी काही समस्यांवर लगेचच तोडगा काढण्यात आला असून काही अडचणींवर लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. तसेच आतापर्यंत ज्यांनी काम सुरूच केलेले नाही, अशा बीएलओंवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी,२०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या कार्यक्रमातंर्गत १५ नोव्हेबर ते ३० नोव्हेंबर, २०१७ या कालावधीत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या विशेष मोहिमेत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी. मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) घरोघरी भेट देवून मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. या कार्यक्रमात पुर्वीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात नांव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना नमुना क्र.६ चे वाटप करणे व त्यांच्याकडून परत घेणे व जमा करणे. सन २०१८ च्या पुनरिक्षणासाठी पात्र नागरिकांना नमुना क्र. ६ चे वाटप करणे व त्यांच्याकडून परत घेणे व जमा करणे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीसाठी पात्र होणा-या नागरिकांची माहिती जमा करणे. स्थलांतरित व मयत मतदारांच्या वगळणीसाठी नमुना क्र.७ चे वाटप करणे व जमा करणे, इत्यादी महत्वाची कामे करण्यात येणार आहे.
आढावा बैठकीत मांडल्या व्यथा
१५ तारखेला या मोहीमेला सुरूवात झाली असल्याने शहरातील ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ७८ बीएलओंनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार दि.२४ रोजी तालुक्यातील बीएलओंची बैठक तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार रूपाली काळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात बीएलओंनी केवळ आॅनलाईनच काम करावयाचे असल्याने अडचणी जाणून घेण्यात आल्या. सर्व बीएलओंना यासाठी मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करून देण्यात आले आहे. मात्र मोबाईल आज्ञावलीचा वापर करुन मतदारांच्या घरांचे अक्षांश व रेखांश गोळा करणे अथवा अक्षांश व रेखांशाचे एसएमएस करणे बंधनकारक आहे. बीएलओ एखाद्या मतदाराच्या घरी गेलेले असतानाच सर्व्हर कनेक्ट न झाल्यास त्यासाठी पुन्हा तेथे जावे लागणे अथवा वाट पाहण्यात वेळ वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत. याखेरीजही तक्रारी आहेत. त्या बीएलओंनी बैठकीत मांडल्या. त्यातील काही समस्या सोडविण्यात आल्या असून काहींबाबत मार्गदर्शन मागवून त्या सोडविल्या जातील, असे तहसीलदारांनी सांगितले.
जि.प. शिक्षण समिती सदस्यांविरूद्ध अपात्रतेची कारवाई
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम हा राष्टÑीय कार्यक्रम असून त्यासाठी बीएलओ म्हणून नियुक्ती केलेल्या कर्मचाºयांना त्यांच्या मूळ कामातून या कालावधीत मुक्त करण्यात यावे, असे आदेशच संबंधीत विभागांना दिले आहेत. असे असतानाही जि.प. शिक्षण समितीच्या सभेत शिक्षकांना बीएलओंची कामे देऊ नयेत असा ठराव करण्यात आला. तो पूर्णपणे बेकायदेशिर असून या राष्टÑीय कामात अडथळा आणणारा आहे. त्यामुळे हा ठराव करणाºया शिक्षण समिती सदस्यांवरच अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती तहसीलदार निकम यांनी दिली.
काम न करणाºया कर्मचाºयांवर गुन्हे
ज्या कर्मचाºयांची बीएलओ म्हणून नियुक्ती होऊनही त्यांनी अद्यापही काम सुरू केलेले नसेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार निकम यांनी दिली.