जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सीमा भोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 20:49 IST2018-09-18T13:04:16+5:302018-09-18T20:49:26+5:30
उपमहापौरपदी डॉ. अश्विन सोनवणे

जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सीमा भोळे
जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सीमा भोळे यांची तर उपमहापौरपदी डॉ. अश्विन सोनवणे यांची निवड करण्यात आली.
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी मंगळवारी सकाळी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभा झाली. स्पष्ट बहुमत व शिवसेनेने महापौर निवडीवर बहिष्कार टाकल्याने महापौरपदी सीमा भोळे तर उपमहापौरपदी डॉ.आश्विन सोनवणे यांची निवड होण्याची शक्यता आधीपासूनच वर्तविली जात होती. भाजपाने ७५ पैकी ५७ तर शिवसेनेला १५ आणि एमआयएमने ३ जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी ३८ नगरसेवकांची आवश्यकता असताना हात उंचावून झालेल्या मतदानात सीमा भोळे यांना ५६ मते मिळाली. या वेळी एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिले.
दरम्यान, शिवसेनेतर्फेही महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेतर्फे चमत्कार होईल, असे सांगितले जात होते.
शिवसेनेता बहिष्कार
नागरिकांच्या समस्यांबाबत लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यासाठी गेलेले शिवसेना गटनेते अनंत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. तसेच महापौर व उपमहापौर निवडीदरम्यान भाजपाचे नगरसेवक संपर्कात असल्यानेच आमदार भोळे यांनी जोशींवर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप शिवसेनेचे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला होता. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने महापौर व उपमहापौर निवडीवर बहिष्कार टाकला.
मनपातील पक्षीय बलाबल
भाजपा- ५७
शिवसेना - १५
एमआयएम- ०३