भाजपची उत्तर महाराष्ट्रस्तरीय संघटनात्मक बैठक शनिवारी जळगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:09 IST2019-12-05T12:09:04+5:302019-12-05T12:09:36+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

भाजपची उत्तर महाराष्ट्रस्तरीय संघटनात्मक बैठक शनिवारी जळगावात
जळगाव : भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांची बैठक ७ डिसेंबर रोजी जळगावात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये जळगाव जिल्ह्यात सध्या बुथ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ७ रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक वसाहतीमधील बालाणी रिसॉर्ट येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन झाल्याने वाघ कुुटुंबीयांच्या भेटीसाठी ७ रोजी सकाळी प्रथम चंद्रकांत पाटील हे अमळनेर येथे जाणार आहे. त्यानंतर ते जळगावात येणार असून त्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पंकजा मुंढे व अॅड. रोहिणी खडसे यांच्या पराभवाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबतही चंद्रकांत पाटील हे माहिती घेणार असल्याचे सांगितले जात आहे.