ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:20+5:302021-06-25T04:13:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले असून, याबाबत राज्य शासन आपली बाजू ...

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्काजाम आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले असून, याबाबत राज्य शासन आपली बाजू न्यायालयात मांडण्यात पुर्णपणे अपयशी ठरली आहे. यामुळे राज्य शासनाने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडावी या मागणीसाठी तसेच याप्रकरणी राज्य शासनाने केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भाजपकडून शनिवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच हेच आंदोलन प्रत्येक तालुक्याचा ठिकाणी देखील होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
२६ जून रोजी ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्यावर भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व खासदार रक्षा खडसे यांच्याकडे देण्यात आले असून, या आंदोलनाची माहिती देण्यासाठी गुरुवारी ब्राह्मण सभेत झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार खडसे बोलत होत्या. यावेळी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटन प्रमुख डॉ.राजेंद्र फडके, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख पी.सी.पाटील आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेआधी आंदोलनाच्या नियोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.
महाविकास आघाडीवर टीकास्त्र
१. बिघाडी सरकारकडून पळते अधिवेशन घेण्याचा घाट - सुरेश भोळे
भाजपच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, राज्यातील आघाडी सरकार हे आघाडी नसून बिघाडी सरकार आहे. जनतेच्या प्रश्नावर हे सरकार दूर पळत असून, आता अधिवेशन देखील केवळ दोनच दिवस घेतले जाणार आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या सरकारला न्यायालयात आपली बाजू मांडताना अपयश आले असून, ते अपयश झाकण्यासाठीच दोन दिवसात अधिवेशन गुंडाळण्याचा घाट बिघाडी सरकारने केला असल्याचा आरोप सुरेश भोळे यांनी केला.
२. करंट्या सरकारने मराठा समाजावर केला अन्याय - स्मिता वाघ
राज्यातील आघाडी सरकार हे नागरिकांच्या दृष्टीने करंटे सरकार असून, मराठा समाजावर अन्याय केल्यानंतर आता ओबीसी समाजावर देखील या सरकारने अन्याय केला आहे. त्यामुळे चक्काजाम आंदोलनातून उत्तर देण्याची गरज असल्याचे आवाहन माजी आमदार स्मिता वाघ यांनी केले.
३. वसुली सरकारने नागरिकांची दिशाभूल केली - संजय सावकारे
राज्यातील सरकार हे वसुली सरकार असून, जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम राज्य शासनाकडून होत असल्याचा आरोप आमदार संजय सावकारे यांनी केला. तर डॉ.राजेंद्र फडके यांनी देखील राज्य शासनावर टीका करत, भाजप कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचे अपयश जनतेपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून पोहचवावे असे आवाहन डॉ.फडके यांनी केले.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने नाराजी
या बैठकीबाबत भाजपच्या जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला अनुपस्थिती लावल्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत सर्व गैरहजर पदाधिकाऱ्यांना विचारणा केली जाणार असल्याचे या बैठकीत भाजप वरिष्ठांकडून सांगण्यात आले.