जळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपकडून ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान बूथ संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना बूथवर जाऊन केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन भाजपचे विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी केले. सोमवारी या उपक्रमाची माहिती देण्यासाठी भाजप जिल्हा ग्रामीणच्या मेळाव्याचे आयोजन ब्राह्मण सभेत करण्यात आले होते. या मेळाव्यात आगामी नगरपालिका, जि.प., पंचायत समिती निवडणुकांचादेखील आढावा घेण्यात आला. तसेच ११ फेब्रुवारी रोजी समर्पण दिवस साजरा करून, भाजपचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी बूथ, गट, मंडलवर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.
पारा १० अंशावर आला खाली
जळगाव : यंदाच्या हिवाळ्यात चांगलेच चढ-उतार पहायला मिळत असून, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, तापमानात वाढीसह तापमान ९ अंशापर्यंतदेखील खाली गेले होते. आता पंधरा दिवसांपासून थंडी गायब होती. मात्र, रविवारपासून पुन्हा थंडीचे आगमन झाले असून, किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते. त्यातच वाऱ्याचा वेगदेखील १६ ते १८ किमी इतका असल्याने थंडीची तीव्रता अधिकच जाणवत आहे. अजून चार ते पाच दिवस थंडीचा कडाका जाणवणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
मनपाचे मैला काढण्याचे मशीन पाच दिवसांपासून बंद
जळगाव : सेप्टिक टँकमधून मैला काढण्याचे मनपाचे मशीन गेल्या पाच दिवसांपासून बंद असून, यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेक नागरिकांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, ६० ते ७० नागरिकांनी सेप्टिक टँकमधून मैला काढण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र, मशीन बंद असल्याने या अर्जांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांना विचारले असता, त्यांनी दोन दिवसात मशीन दुरुस्त होणार असून, काही तांत्रिक कारणामुळे मशीन बंद होती. मात्र, तत्काळ दुरुस्तीला टाकली असल्याची माहिती पवन पाटील यांनी दिली.
रोटरी वेस्टतर्फे रक्तदान शिबिर
जळगाव : येथील रोटरी क्लब वेस्ट व जळगाव सायकलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने मंगळवार २६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा़ असे आवाहन करण्यात आले आहे.