भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम नसतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:32+5:302021-06-11T04:12:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाघाशी मैत्री करायला आवडेल, असे म्हटले असले तरी ते ...

BJP state president Chandrakant Patil is not firm on his position | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम नसतात

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम नसतात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाघाशी मैत्री करायला आवडेल, असे म्हटले असले तरी ते आपल्या मतावर कधीच ठाम नसतात. आजपर्यंत त्यांनी ठाम भूमिका घेतलेली नाही, अशी टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले होते की, ‘आम्हाला वाघाशी मैत्री करायला आवडेल’. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ही टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे गुरुवारी सकाळी जळगावात आले होते. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर ते आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

मैत्री करायची आहे तर जा

चंद्रकांत पाटील मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात. त्यांनी आजपर्यंत ठामपणे भूमिका घेतलेली नाही. आता सांगितले, नंतर बदलले, असा आजवरचा माझा अनुभव राहिला आहे. त्यांना मैत्री करायची असेल तर त्यांनी करावी, त्यांच्याकडे जावे, असे खडसेंनी सांगितले.

पक्षवाढीसाठी प्रयत्न करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २२ वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले आहेत. पक्षाच्या वाटचालीवर नजर टाकली तर सर्वांनी पक्ष विस्तारासाठी परिश्रम घेतल्याचे दिसून येते. परंतु, अजूनही पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पक्षाची वाटचाल २२ वर्षांची झाली आहे, म्हणजे पक्ष आता तारुण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष अधिकाधिक लोकांपर्यंत जावा म्हणून प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: BJP state president Chandrakant Patil is not firm on his position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.