भाजप- शिवसेना युती माझ्यामुळेच झाली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:59 IST2019-03-29T11:58:48+5:302019-03-29T11:59:35+5:30
गिरीश महाजनांनी थोपटली स्वत:चीच पाठ

भाजप- शिवसेना युती माझ्यामुळेच झाली...
जळगाव : भाजपा व शिवसेनेची युती ही माझ्यामुळेच झाली असल्याचा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी शहरातील सागरपार्क मैदानावर झालेल्या युतीच्या मेळाव्यात केला. तसेच कोल्हापूर येथे झालेल्या युतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात गिरीश महाजन यांच्यासाठी आपण युती केली असल्याचा खुलासा केला असल्याचे सांगत महाजनांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.
भाजपा व शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली असून, ही आता देखील कायम आहे. पूर्वी ज्या प्रकारे शिवसेनेकडून शब्दांचे हल्ले चढवले जात होते. ते आता होत नाही. जसे युतीमध्ये वरच्या स्तरावर चांगले सुरु आहे. तसेच खालच्या पातळीवर देखील चांगले राहील, असे महाजन यावेळी म्हणाले. हल्ली मला ‘संकटमोचक’, ‘सुपरमॅन’ अशा शब्दांच्या बिरुदावल्या लावल्या जात असून, ‘गिरीश महाजन आहे. म्हणून सर्व काही ठिक होईल’ असे म्हटले जात आहे. मात्र, या अर्विभात राहू नका, कारण मी एकटा काहीही करू शकत नसून,आपण सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या जिभेला हाड नाही
महाजन यांनी राज ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल करत त्यांच्या जिभेला हाडच नसून, ते काहीही बडबड करत असल्याचा आरोप महाजनांनी केला. ज्यांचा पक्षाचा एकही नगरसेवक, आमदार निवडून येत नाही. ते राष्टÑीय सुरक्षेच्या मुद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचेही महाजन यांनी सांगितले.
विखेंच्या प्रवेशामुळे कॉँग्रेस दुभंगली
सुजय विखे पाटील यांनी राष्टÑवादीकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांनी ती उमेदवारी दिली नाही.त्यामुळे ही सुजय विखेला आपल्या पक्षात घेण्याची संधी मी सोडली नाही. कारण कॉँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचा मुलगा भाजपात येत असल्याने कॉँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होणार होती. त्यामुळेच विखेंना भाजपात आपण घेतले असल्याचा खुलासा महाजन यांनी केला. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे कॉँग्रेस आता दुभंगली असल्याचे ते म्हणाले.
हीच बाब रणजितसिंह मोहीते-पाटील यांच्याबाबतीतही घडली.आता कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसचे २५ जण भाजपात येण्यास उत्सुक असून, त्यांचा मार्ग देखील जळगावमधून जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या.आता या निवडणुकीत ४५ जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.