भाजपला करून दिली जातेय आश्वासनांची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:17 PM2020-09-09T12:17:45+5:302020-09-09T12:18:01+5:30

जळगाव : दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शहराचा चेहरा-मोहरा बदलवून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन देत मनपात ...

BJP is reminded of the promises made | भाजपला करून दिली जातेय आश्वासनांची आठवण

भाजपला करून दिली जातेय आश्वासनांची आठवण

googlenewsNext

जळगाव : दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शहराचा चेहरा-मोहरा बदलवून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन देत मनपात सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांना त्यांनीच दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची लागलेली वाट, दोन दिवसाआड भल्या पहाटे होणारा पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या, डास, भटके कुत्रे, मोकाट गुरांचा त्रास अशा विविध समस्यांबाबत सर्वसामान्य जळगावकरांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची आठवण जळगावकरांकडून करून दिली जात आहे.
निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आश्वासनांचे व्हिडीओ, वृत्तपत्रीय कात्रणे, जाहिरनाम्याची प्रत सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात जळगावकरांना व्हिडीओव्दारे दाखविलेले विकासाच्या स्वप्नांचे भाषण, जळगावकरांनी पुन्हा आपल्या स्टोअरमधून शोधून काढले आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीच्या काळात भाजपला सत्ता द्या, एका वर्षातच जळगावचा चेहरा-मोहरा बदलवून दाखवू असे आश्वासन जळगावकरांना दिले होते. आता महाजन यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली जात आहे. एवढेच नाही तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश भोळे यांनी प्रचारासाठी ‘चीड येते का खड्ड्यांची’ हे घोषवाक्य वापरून जळगावकरांची मते घेतली होती. मात्र, जळगाव शहरातील रस्त्यांची सध्याची स्थिती पाहता, आता जळगावकर याच घोषवाक्यांची आठवण आमदार भोळेंना करून देत आहेत.
फडणवीसांकडून आश्वासनांचा पाऊस
जळगाव शहराच्या विकास आराखडा तयार असून, त्यानुसार एमआयडीसीचा विस्तार, समांतर रस्त्यांचा प्रश्न, चौकांचे सौंदर्यीकरण करून, व्यापारी गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावणार. हुडको व जिल्हाबॅँकेचे कर्जावर सकारात्मक निर्णय घेवू, जळगाव शहरातील वाढीव क्षेत्रातील भागाचा विकास करण्यात येईल. जळगावचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरु करू, जळगाव शहराला सुंदर, सुरक्षित आणि स्मार्ट बनवून दाखवू , विकास हाच आपल्यादृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. वर्षांनुवर्ष विकासापासून वंचित असलेल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देवून, त्यांचे जीवन सुखकर करण्याचा भाजपचा प्रयत्न राहिल अशी आश्वासने तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात व्हिडीओव्दारे केलेल्या आवाहनात जळगावकरांनी दिली होती. केवळ कर्जाचा मुद्दा मार्गी लागला, इतर आश्वासने हवेत विरली आहेत.

गिरीश महाजन यांनी दिलेले आश्वासन
-जळगावकरांनी सुरेशदादा जैन यांना ३० वर्षे दिली. आम्हाला काही वर्षे द्या, एका वर्षाच्या आत जळगाव शहराचा सर्वांगिण विकास करून, शहराचा चेहरा-मोहरा बदलवून दाखवू.
-केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. जळगाव मनपात देखील भाजपची सत्ता आली तर केंद्र व राज्याकडून शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही.

-रस्ते, उड्डाणपूल, व्यापारी गाळ्यांचा प्रश्न, समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येतील. सत्ता आल्यानंतर महिनाभराच्या आतच १०० कोटींचा निधी जळगाव शहरासाठी राज्यसरकारकडून आणू व शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न करू, जळगावकरांनी भाजपला सत्तेची केवळ एक संधी द्यावी असे गिरीश महाजन यांनी मनपा निवडणुकीच्या काळात जळगावकरांना आश्वासन दिले होते.

Web Title: BJP is reminded of the promises made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.