...तर भाजप रस्त्यावर उतरेल, एकनाथ खडसेंच्या सूनबाईंचा सरकारला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 04:14 PM2020-11-18T16:14:58+5:302020-11-18T16:16:09+5:30

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलनं करावी लागत आहेत. कारण...

bjp leader raksha khadses slap to state government and nitin raut over electricity bill issue | ...तर भाजप रस्त्यावर उतरेल, एकनाथ खडसेंच्या सूनबाईंचा सरकारला थेट इशारा

...तर भाजप रस्त्यावर उतरेल, एकनाथ खडसेंच्या सूनबाईंचा सरकारला थेट इशारा

Next

मुक्ताईनगर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र आता, जेवढे बिल आले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. सरकारने यासंदर्भात योग्य भूमिका घेतली नाही, तर जनहितार्थ भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा रक्षा खडसे यांनी सरकारला दिला आहे.

न्यूज18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, 'जेवढे बिल आलेले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिल माफ करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकत नसले तरी, काही प्रमाणात का होईना ग्राहकांना सवलत द्यायला हवी," अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.

एवढेच नाही, तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलनं करावी लागत आहेत. कारण भाजप हा वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहे, असेही खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

राजू शेट्टींनीही दिला रस्त्यावर उतरण्याचा इशारा -
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले, ऊर्जामंत्री नितीन राऊत वारंवार सांगत होते, आम्ही काही ना काही मदत करू, दिवाळीला गोड बातमी देऊ, सक्तीची वसुली करा ही गोड बातमी? सरकारमधील मंत्री अशाप्रकारे बेजबाबदार विधान करत असतील तर सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल, आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ, रस्त्यावर उतरू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ऊर्जामंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणणार -
वाढीव वीज बिलाबाबत दिलासा दिला जाईल, असे वारंवार सांगणारे ऊर्जा मंत्री राऊत यांनी त्या बाबत यू-टर्न घेऊन ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला. राऊत यांच्याविरुद्ध विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल, खोटारड्या सरकारला हजार व्हॉल्टचा शॉक देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तर महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या श्रेयवादात वीज बिल सवलत अडली, असा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. दिवाळीपूर्वी वीज ग्राहकांना गोड बातमी देऊ म्हणणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी कडू बातमी दिली, अशी टीका वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केली.


 

Web Title: bjp leader raksha khadses slap to state government and nitin raut over electricity bill issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.