लोकमत न्यूज नेटवर्क, मुक्ताईनगर, जि. जळगाव : उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी तथा भाजपच्या नेत्याच्या कन्येसह तिच्या मैत्रिणीची संत मुक्ताबाई यात्रोत्सवात छेड काढल्याप्रकरणात आणखी दोन जणांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीनंतर अटक केली, आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. किरण माळी (२१) व एक अल्पवयीन अशा दोघांना रविवारी रात्री तर अनिकेत भोई (२६), अनुज पाटील (१९) या दोघा संशयितांना रविवारी मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली.
अल्पवयीनवगळता तीन आरोपींना सोमवारी भुसावळ येथील विशेष सत्र न्यायालयाने दि. ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. अल्पवयीन आरोपीला जळगावातील बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले.
भुसावळ विशेष सत्र न्यायालयात पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तिन्ही संशयितांना बंदोबस्तात हजर केले. यावेळी सरकार पक्षातर्फे ॲड. संजय सोनवणे यांनी आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली, तर संशयित आरोपींतर्फे ॲड. मनीष सेवलानी व ॲड. चरणसिंग सिंग यांनी युक्तिवाद केला.
तीन जण फरार..
छेडछाडप्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील पीयूष मोरे, चेतन भोई, सचिन पालवे (सर्व मुक्ताई नगर) हे अद्यापही फरार आहेत. मुख्य आरोपी अनिकेत भोई याच्यावर मुक्ताईनगर पोलिसांत चार गुन्हे दाखल आहेत. तो शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाइक आहे. आरोपींमध्ये एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे.