एकनाथ खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:54+5:302021-07-24T04:11:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजप हा नेत्यांचा नव्हेतर, कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकनाथ खडसे असो की अन्य कोणी असो ...

BJP doesn't care if anyone leaves Eknath Khadse | एकनाथ खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही

एकनाथ खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भाजप हा नेत्यांचा नव्हेतर, कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकनाथ खडसे असो की अन्य कोणी असो ते पक्ष सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही, असे स्पष्ट मत माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. इतके दिवस झाले तरी राष्ट्रवादीने खडसे यांना मंत्रिपद दिले नाही, अजूनही त्यांना लटकवून ठेवले आहे, अशी टीकादेखील बावनकुळे यांनी केले.

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौऱ्यांतर्गत चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद झाली, त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, उत्तर महाराष्ट्र प्रमुख बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

भाजप हा ओबीसी आणि बहुजनांचा सन्मान करणारा पक्ष

ओबीसी आणि बहुजन समाजाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपवर होणाऱ्या आरोपांबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, भाजप हा ओबीसी आणि बहुजनांचा सन्मान करणारा पक्ष आहे. फडणवीस सरकारमध्ये ६० टक्के मंत्री हे ओबीसी होते. आज महाविकास आघाडी सरकार आणि फडणवीस सरकारची तुलना करा. फरक सर्वांच्या लक्षात येईल, असेही बावनकुळे म्हणाले.

पक्षाने अन्याय केला म्हणणे चुकीचे

मी असो अथवा एकनाथ खडसे असो, सर्वांना पक्षाने खूप काही दिले. पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय केला, हे खडसेंचे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्या बाबतीत एखादा विषय झाला असेल, काही घटना घडली असेल तर लगेचच पक्ष चुकीचा ठरत नाही. एकनाथ खडसे हे पक्ष सोडून गेल्याने पक्षाचे काही एक नुकसान झालेले नाही. खडसेच काय तर कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडणार नाही. कारण भाजप हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे, नेत्यांवर नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी खडसेंच्या आरोपांचाही समाचार घेतला.

जाणीवपूर्वक अन्याय करेल एवढी हिंमत कोणाची नाही

एकनाथ खडसे हे आमचे नेते होते. त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी असायचो. त्यांचा सल्ला इतर मंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस हेदेखील घेत होते व त्यांचा आदर करीत होते. खडसे यांच्यावर कोणी जाणीवपूर्वक अन्याय करेल, एवढी हिंमत कोणात नव्हती, असे बावनकुळे यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी खडसे यांच्या मनात संभ्रम निर्माण केल्याचा दावादेखील त्यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या बाबतही झारीतील शुक्राचार्य वेगळेच असून, ते इतर पक्षांतील असल्याचे बावनकुळे म्हणाले.

तक्रार असल्याशिवाय चौकशी होत नाही

बावनकुळे हे राज्य सरकारवर टीका करीत असताना त्यांना केंद्र सरकारदेखील ईडी अथवा इतर चौकशी करीत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, खडसे असो अथवा इतर कोणाविषयी चौकशी ही तक्रार असल्याशिवाय होत नाही. कोणीतरी तक्रार केली असेल म्हणून चौकशी झाली व नंतर त्याच्या अहवालानुसार कारवाई होते.

प्रलोभने दाखवून फोडाफोडी

भाजप एकीकडे युवा वर्गाला जोडत असताना जळगावात भाजपचे नगरसेवक पक्षाला सोडून का गेले? याविषयी बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारकडून पाच-पन्नास लाख दिले जातात, चॉकलेट दिले जाते, असे प्रलोभन दाखवून फोडाफोडी केली जाते. जळगावातही प्रलोभन दाखविले गेले, मात्र ते नगरसेवक कमळ चिन्हावर निवडून आले असून, जनता त्यांना माफ करणार नाही. पुढच्या निवडणुकीत त्यांनी जनतेसमोर जाऊन दाखवावे, असे आव्हानदेखील त्यांनी दिले.

ज्यात पैसा खायला मिळतो, त्याच योजना सुरू

ज्या योजनांमध्ये पैसा खायला मिळतो, त्याच योजना सुरू करण्यास या सरकारला रस असून वैयक्तिक लाभाच्या योजनांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. जलयुक्त शिवारमध्ये कोणताही भ्रष्टाचार नसून यामुळे गावांमध्ये पाणी आले आहे. आता ही योजना बंद करून तो पैसा दुसरीकडे वळवायचा असल्याने महाविकास आघाडी सरकार हे राजकारण करीत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: BJP doesn't care if anyone leaves Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.