वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:01+5:302021-09-07T04:22:01+5:30
जळगाव : वाढदिवसाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जयेश रवींद्र माळी (वय २४, ...

वाढदिवसच ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस
जळगाव : वाढदिवसाचे औचित्य साधून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर पर्यटनाला गेलेले जयेश रवींद्र माळी (वय २४, रा. वाघ नगर) व अक्षय उर्फ उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय २३, रा. खेडी, जळगाव) दोन तरुण रविवारी दुपारी चार वाजता धरणात बुडाले. दोघांचे मृतदेह २१ तासांनी अर्थात दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १ वाजता धबधब्यात आढळून आले. जयेश माळी याचा रविवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी त्याला मृत्यूने कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश याचा वाढदिवस असल्याने त्याच्यासह १६ मित्रांनी बऱ्हाणपूर येथील बसाली धबधब्यावर जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार जयेश, उज्ज्वल व त्याचा लहान भाऊ यांच्यासह सर्व मित्र वेगवेगळ्या वाहनाने रविवारी सकाळी ८ वाजता बऱ्हाणपूरकडे रवाना झाले. त्याठिकाणी पाण्यात खेळत असतांना जयेशचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवितांना उज्ज्वलही पाण्यात बुडाला. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाल्याने दोघांच्या शोधार्थ रात्री ११ वाजेपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, दोघेही सापडले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपासून शोधमोहीम राबविण्यात आली. दुपारी १२.३० वाजता धबधब्याच्या एका कपारीत अडकलेले दोघांचे मृतदेह मिळून आले. त्यांची ओळख पटविली असता जयेश व उज्ज्वल हे दोघे असल्याचे समोर आले. दोघांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. दोघांचे मृतदेह बऱ्हाणपूर येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी हलविण्यात आले. विच्छेदनानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयेशचे उच्च शिक्षण तर उज्ज्वल नोकरीला
जयेशच्या पश्चात आई वर्षा, वडील रवींद्र बाबुराव माळी, तर लहान भाऊ अजय असा परिवार आहे. रवींद्र माळी हे अकाऊंटंट म्हणून खासगी नोकरी करतात. गेल्या वर्षी जयेशने चेन्नई येथे इंडियन ऑईल याठिकाणी ॲप्रन्टिसशिप पूर्ण केली होती. त्यानंतर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. इलेक्ट्रीक्लच्या दुसऱ्या वर्षाला होता. जयेशचा लहान भाऊ हा बी. ई. मेकॅनिकलचे शिक्षण घेत आहे. उज्ज्वल हा एका वित्तीय संस्थेत वसुलीचे काम करायचा, तर त्याचे वडील ऑटोमोबाईल क्षेत्रात कामाला आहेत. उज्ज्वल हा कुटुंबासह मामाच्या गावाला स्थायिक झाला होता. त्याच्या पश्चात वडील राजेंद्र पाटील, आई सुनीता व लहान भाऊ असा परिवार आहे.