अनलॉकमध्ये दुचाकी व्यवसाय तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:52 IST2020-07-24T17:51:02+5:302020-07-24T17:52:43+5:30
अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला आहे.

अनलॉकमध्ये दुचाकी व्यवसाय तेजीत
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : कोरोना लॉकडाऊनमध्ये मंदीच्या सावटाखाली गेलेले आॅटोमोबाईल क्षेत्र विशेषत: दुचाकी व्यवसाय कमालीचा मंदावला होता, मात्र अनलॉकमध्ये शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा आदी बंद केल्या किंवा त्यांच्यातील काहींवर निर्बंध आणल्याने नागरिकांचा दुचाकी खरेदीकडे कल वाढला असून, दुचाकी व्यवसायात तेजी आली आहे.
सुरुवातीला कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय जवळपास डबघाईला गेले होते. हळूहळू कोरोनासोबत जनजीवन पूर्वपदावर यावे, अर्थचक्र फिरावे याकरिता शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली. शहरात आठवड्यातून तीन दिवस हे दुचाकी वाहनांच्या खरेदी विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात दुचाकी विक्री होत नव्हती. मात्र आता पाच दिवसांचा आठवडा करताच दुचाकी व्यवसायात कमालीची तेजी आली आहे. हमखास दररोज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात कोरोना काळात वाहनांची विक्री होत आहे.
कोरोनाचा दुचाकी विक्रेत्यांसाठी असाही सकारात्मक परिणाम
कोरोना संक्रमण समूहात पसरतो. गर्दी होऊ नये याकरिता शासनाने बसेस, रेल्वे, रिक्षा बंद केले किंवा त्यांच्यावर निर्बंध आणले. अर्थातच जे चाकरमान जळगाव, रावेर, चाळीसगाव, पाचोरा व अन्य ठिकाणी रेल्वेने, बसने अप-डाऊन करत होते त्यांची मदार आता दुचाकीवर आली किंवा त्यांना स्वत:च्या बचावासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागण ‘खत्रे से खाली नही’ म्हणून फायनान्स, इंस्टॉलमेंट ने का होईना चाकरमाने दुचाकीला खरेदीसाठी पसंती देत आहेत. कोरोना काळाय प्रशासनाने बंद केलेल्या प्रवासी वाहतूक सेवेचा सकारात्मक परिणाम दुचाकी विक्रीवर झाल्याचे दिसून येत आहे.
शंभर ग्राहकातून ८० टक्के ग्राहकांकडून केली जाते खरेदी
अनलॉकमध्ये भुसावळ शहरात मंगळवार व शनिवार 'जनता कर्फ्यू' घोषित करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या आठवड्यात जो व्यवसाय सात दिवसात होत होता, तोच व्यवसाय आता पाच दिवसात होत आहे. शंभरपैकी ८० टक्के ग्राहक हे हमखास दुचाकी खरेदी करतात. त्याचं कारणही तसेच पूर्वी गाडी खरेदी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह मित्रमंडळी खरेदी करण्यासाठी येत होती व अनेक वेळा फक्त चौकशी करून निघून जायचे. मात्र आता ज्यांना दुचाकीची खरंच गरज आहे अशी मंडळी कुटुंबियांना सोबत न आणता एखाद दोन व्यक्ती येऊन शारीरिक अंतराचे भान ठेवून शहानिशा केल्यानंतर दुचाकी बुक करीत आहेत. पूर्वीच्या मानाने दुचाकी वाहन विक्रीत 'रियल खरीददार' खरेदीसाठी येत आहेत. उगाच कोरोनाची भीती असल्याने चौकशीसाठी कोणीही येत नसल्याचे दुचाकी विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दहावी-बारावीच्या निकालानंतर होते मोठी मागणी
यंदा कोरोनामुळे उशिराने निकाल लागत असले तरी निकाल लागल्यानंतर आई-वडील, आप्तेष्ट पुढील शिक्षणासाठी व मुलांचा प्रोत्साहन वाढावे याकरिता हमखास दुचाकी घेऊन देतातच. यामुळेसुद्धा दुचाकी वाहनांची विक्री दहावी बारावीच्या निकालानंतर हमखास वाढते, असा अनुभव आहे.