बीएचआर घोटाळा- 18 जिल्ह्यांतील बडे कर्जदार व एजंट रडारवर;कारवाईमुळेे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 10:15 IST2021-06-21T10:13:31+5:302021-06-21T10:15:02+5:30
बीएचआरच्या संचालक मंडळाविरुद्ध राज्यातील २२ जिल्ह्यांतील ८१ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

बीएचआर घोटाळा- 18 जिल्ह्यांतील बडे कर्जदार व एजंट रडारवर;कारवाईमुळेे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू
जळगाव : बीएचआर प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव, धुळे, औरंगाबाद व अकोला या चार जिल्ह्यांत कारवाईचा फास आवळला आहे. यानंतर इतर १८ जिल्ह्यांतील बडे कर्जदार, कमी किमतीत जागा खरेदी करणारे व सेटलमेंट करणारे एजंट रडारवर आले असून, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एका नेत्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भेट घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
बीएचआरच्या संचालक मंडळाविरुद्ध राज्यातील २२ जिल्ह्यांतील ८१ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत, तेथेही नियम डावलून कर्ज देण्यात आले होते, तर अवसायकाच्या काळात लिलाव दाखवून कमी किमतीत जागा खरेदी-विक्रीचा व्यवहार झालेला आहे. नंतर बड्या कर्जदारांचे कर्ज फेडण्यासाठी जळगावप्रमाणेच ठेवीदारांच्या पावत्या २० ते ३० टक्क्यांत खरेदी करून त्या कर्जात समायोजित करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी एजंटांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या जिल्ह्यातील कर्जदार, ठेवीदार व समायोजित कर्ज प्रकरणांची पडताळणी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जात आहे. जसे जसे पुरावे हाती लागतील, तशी एकाच वेळी अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिक, बुलडाणा, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे व परभणी येथे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. इतर ठिकाणी एक ते तीन गुन्हे दाखल आहेत.
लहान कर्जदारांना जप्तीचा धाक
अवसायक जितेंद्र कंडारेचा एक हस्तक हा लहान कर्जदारांना न्यायालयीन कारवाई व संस्थेकडून जप्तीच्या कारवाईचा धाक दाखवून या थकीत कर्जदारांकडून लाखो रुपयांची वसुली करीत होता. या हस्तकाला कंडारेकडून थकीत कर्जदाराची यादी मिळायची, त्यानुसार हा थेट कर्जदारांना जाऊन भेटायचा. हा हस्तक थेट लाचेची मागणी करायचा. तुम्ही इतकी रक्कम द्या, काही दिवस तुमच्याकडे कुणीच वसुलीला येणार नाही आणि आले तरी मी बघून घेईन, असे सांगून काही रक्कम त्या कर्जदाराकडून घेतली जायची, असेही सांगितले जात आहे.