बीएचआर प्रकरणात ठराविकांनाच केले जातेय टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:55+5:302021-06-18T04:12:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर प्रकरणी अटक झालेले माझे जवळचे असून, जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्या जवळचा असल्याचे माजी ...

बीएचआर प्रकरणात ठराविकांनाच केले जातेय टार्गेट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआर प्रकरणी अटक झालेले माझे जवळचे असून, जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्या जवळचा असल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ सांगितले. तसेच या प्रकरणी केवळ ठराविक लोकांना टार्गेट केले जात आहे. यामध्ये निष्पक्ष कारवाई होणे अपेक्षित असल्याचे मत महाजन यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केले आहे. या प्रकरणात राजकीय वास येत असून, पक्षपात केला जात असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
बीएचआर प्रकरणात जिल्ह्यातील बड्या १२ जणांना गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील सहकार व राजकीय क्षेत्र देखील हादरून गेले आहे. या प्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून, गिरीश महाजन यांनी या प्रकरणी राजकारण केले जात असल्याचे सांगितले. तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार असो वा कुणी अन्य असो कायद्यासमोर सर्वच सारखे असल्याचे सांगितले आहे.
कोट...
बीएचआर प्रकरणी तपासयंत्रणा आपले काम करत आहे. चौकशीचा भाग असून, या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
-गुलाबराव पाटील, पालकमंत्री
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. या पतसंस्थेच्या घोटाळ्यात झालेल्या अटकेच्या कारवाईचे स्वागतच आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आमदार असो वा कुणी अन्य असो कायद्यासमोर सर्वच सारखे आहे. या प्रकरणात प्राथमिक स्वरुपात कर्जदारांनी ठेवींच्या पावत्या २० टक्के, ३० टक्के दराने तोडून भरणा केलेला दिसतो. त्यामुळेच ही कारवाई झालेली आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरु असून जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- एकनाथ खडसे, माजी मंत्री.
या प्रकरणी काही ठराविक जणांवरच कारवाई केली जात आहे. या सर्व प्रकरणात राजकीय वास येत असून, ५०० हून अधिक जणांनी कर्ज भरले आहे. मग ठराविक १० ते १२ जणांना टार्गेट का केले जात आहे ?, कारवाई करायची असेल तर सर्वांवर करणे गरजेचे आहे. नियमाप्रमाणे सर्वांवर कारवाई केली तर ती निष्पक्ष म्हटली जाईल. मात्र, ठराविक लोकांवर कारवाई करून केवळ खालचे राजकारण केले जात आहे.
-गिरीश महाजन, माजी मंत्री.
या प्रकरणात विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या घराची आमच्या पथकाने झडती घेतली नाही.
भाग्यश्री नवटके, उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा, पुणे.