निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वीच भगत बालाणी यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा
By सुनील पाटील | Updated: March 28, 2023 13:27 IST2023-03-28T13:26:54+5:302023-03-28T13:27:30+5:30
माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी बालाणी यांच्या जातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वीच भगत बालाणी यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा
जळगाव : राज्य शासन व निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वी भाजपचे नगरसेवक भगतराम रावलमल बालाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांना सादर केले. बालाणी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आलेले आहे. या निर्णयानंतर मनपा आयुक्तांनी विधी विभागाच्या अभिप्रायासह शासन तसेच निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला आहे. अजून त्यांच्याकडून कुठलाच निर्णय झालेला नाही, तत्पूर्वीच बालाणी यांनी राजीनामा दिला आहे.
माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी बालाणी यांच्या जातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौकशी करून प्रमाणपत्र रद्दबातल ठरवले आहे. त्यामुळे बालाणींवर काय कारवाई करता येईल यासंदर्भात आयुक्तांनी विधी विभागाचा अभिप्राय मागवला होता. मनपाने शासन व निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवून कलम ५ ब नुसार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करावी असे नमूद केले होते. मात्र यासंदर्भात दोन्ही यंत्रणांकडून कुठलाच निर्णय झालेला नाही.
बालाणी हे महापालिकेत भाजपचे गटनेतेही होते. जातप्रमाणपत्र निर्णयाच्या विरोधात बालाणी यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठातही अपील दाखल केलेले आहे, त्याचा निर्णय लागलेला नाही. ऑगस्ट महिन्यात महापालिकेचे मुदतही संपुष्टात येणार आहे. आपले खंडपीठात अपील कायम आहे. राजीनामा स्वखुशीने दिलेला आहे, जातप्रमाणपत्राशी संबंधित कोणतेही कारण नसल्याचे बालाणी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले आहे.