चोपडा येथे भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:46 IST2019-03-01T22:46:17+5:302019-03-01T22:46:37+5:30
५९ हजार व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले

चोपडा येथे भरदिवसा घरफोडी
चोपडा : संजीवनी नगरात भरदिवसा घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्तावास्त फेकून रोख ५९ हजार व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. गुरुवारी भरदुपारी ही घटना घडली.
संजीवनी नगरमधील रहिवासी व कंत्राटदार जितेंद्र हिम्मतराव पाटील हे कामानिमित्त नगरपालिकेत गेले असताना व पत्नी दीप्ती पाटील या शेजारी पापड करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधली व बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातून रोख रक्कम ५९ हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
जितेंद्र पाटील यांच्या फियार्दीवरून शहर पोलीसस्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश पालवे हे करीत आहेत.