लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बँक खाते, ओटीपी क्रमांक तसेच एटीएम कार्डची माहिती घेऊन फसवणुकीच्या प्रकारासोबतच आता सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारदेखील वाढले असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. यामध्ये गेल्या आठ महिन्यात १७ जणांच्या अशा तक्रारी आल्या आहेत. मात्र कोणी जास्त वादात न पडण्याच्या विचाराने गुन्हेही दाखल होऊ शकले नाहीत.
सणासुदीचे दिवस आले म्हणजे विविध वस्तूंच्या दुकानांवर वेगवेगळ्या वस्तूंवर ऑफर्स दिल्या जातात. या सोबतच या सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल ऑनलाईन शॉपिंगवर ऑफर्सदेखील दिल्या जातात. मात्र यात अनेक वेळा फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
सध्या ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून किरकोळ वस्तूंपासून ते फर्निचर असो अथवा वाहने असो यांची विक्री यावर होत आहे. यात आपण ज्या वस्तू मागविल्या त्या येतादेखील, मात्र बऱ्याच वेळा मागविलेल्या वस्तूंऐवजी दुसरीच वस्तू येते तर कधी काही वस्तू खराब निघाल्यास त्या परत केल्यानंतर त्याची रक्कम परत घेण्यासाठी ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती घेतली जाते. मात्र यात अनेक वेळा फसवणूकदेखील होत असते.
अशी होऊ शकते फसवणूक
१) ऑनलाईन फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर येत असताना खरेदीमध्येदेखील अशी फसवणूक होत आहे. जळगावातील एका व्यक्तीने ऑनलाईन मोबाईल मागविला होता. ज्या वेळी त्याला पार्सल आले व त्याने ते उघडले तर त्यात चक्क मोबाईलऐवजी बूट निघाला. या व्यक्तीने याची चौकशी करण्यासाठी थेट टपाल कार्यालय गाठले. तेथे तक्रार केली मात्र कंपनीकडून जे पार्सल आले ते आपल्याला देण्यात आल्याचे सदर व्यक्तीस सांगण्यात आले.
२) एका व्यक्तीने कपडे मागविले असता त्याला ते आले, मात्र त्यात दोष (डिफेक्ट) निघाल्याने त्याने तर परत करण्याची प्रक्रिया केली. कपडे परत केले व त्याच्या बँक खात्याची माहिती मागितली. मात्र त्याला रक्कम काही परत मिळाली नाही. या विषयी वारंवार चौकशी करूनही काही दिवसात रक्कम परत मिळेल, असे सांगितले जात होते. अखेर या व्यक्तीने रक्कम परत मागणे सोडून दिले.