जीएमसीत लसीकरणाचे लाभार्थी दोन तास ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST2021-02-27T04:22:08+5:302021-02-27T04:22:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत ...

जीएमसीत लसीकरणाचे लाभार्थी दोन तास ताटकळले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत कोविन ॲप न उघडल्याने दोन तास ३० ते ३५ लाभार्थी लसीकरणासाठी ताटकळले होते. यात अखेर जि. प. च्या काही कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयातील केंद्रावर जावून पाच मिनिटात लसीकरण करून घेतले. काही जण परतल्याची माहिती आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुस्थितीत सुरू असलेली यंत्रणा शुक्रवारी अचानक कोलमडली होती. यामुळे जीएमसीतील दिवसभराचा लसीकरणाचा आकडाही घसरला असून दिवसभरात या केंद्रावर केवळ ३८ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. जिल्हाभरात ७७५ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला तर ४१४ जणांनी दुसरा डोस घेतला. यात पाचोरा केंद्रावर सर्वाधिक ९८ जणांनी लस घेतली.
कर्मचारी बदलले
ॲपवर नोंदणीचे नियमीत कामे करणारी डाटा एंट्री ऑपरेटर आता त्यांच्या पुर्वनियोजीत जागांवर नियुक्त करण्यात आले असून लसीकरणासाठी नवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातही बराच कालावधी जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. शिवाय पोर्टलच उघडत नसल्याने सुरूवातीचे दोन तास केंद्रावर गर्दी झाली होती.
पंचायत राजचे दहा हजार कर्मचारी आता केव्हा..
पंचायत राजचे साधारण पंधरा हजार कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी माहिती मागविण्यात आली होती. मात्र, निर्धारीत वेळेत केवळ पाच हजार कर्मचाऱ्यांचीच नोंदणी झाली व सिस्टीम लॉक झाली असून आता उर्वरित दहा हजार कर्मचाऱ्यांचा नेमका कधी नंबर लागेल हे गुलदस्त्यात असून प्रशासनाच्या किंवा कर्मचाऱ्यांचा वेळकाढूपणाचा फटका बसू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.