कापूस वेचताना मधमाशांचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू
By सुनील पाटील | Updated: October 17, 2024 15:52 IST2024-10-17T15:51:03+5:302024-10-17T15:52:05+5:30
नातेवाईकांनी दोघांना तातडीने जळगावला दवाखान्यात हलविले, मात्र विकास यांचा रुग्णालयात येण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाला.

कापूस वेचताना मधमाशांचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू
जळगाव : जळगाव तालुक्यातील वडली येथे शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या विकास चुडामण पाटील (वय ५५) व रत्ना विकास पाटील (वय ४८) या दोघांवर मधमाशांनी हल्ला केला. या दोघांना जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात आणत असताना विकास यांचा वाटेतच मृत्यू झाला. रत्ना यांच्यावर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता जवखेडा शिवारात घडली.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडली येथील रहिवाशी असलेले विकास पाटील यांची शेती शेजारील जवखेडा शिवारात गट नंबर ८२/१/२ मध्ये आहे. सकाळी साडे दहा वाजता पती-पत्नी शेतात कापूस वेचणीसाठी गेले असताना अचानक मधमाशांनी दोघांवर हल्ला चढविला. यात ते सैरावैरा पळत सुटले. रत्ना यांनी लागलीच जेठ शिवाजी पाटील यांना फोन करुन घटनेची माहिती दिली.
नातेवाईकांनी दोघांना तातडीने जळगावला दवाखान्यात हलविले, मात्र विकास यांचा रुग्णालयात येण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाला. मधमाशांनी जीभेवर चावा घेतल्याने विकास यांची जीभ सुजली होती. रत्ना यांच्या तोंडावर, हातावर व शरीरावर माशांनी चावा घेतला. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विकास यांच्या पश्चात पत्नी, हितेश व सागर अशी दोन मुले आहेत. दोघंही अविवाहित आहेत.