धोकादायक पुलाला डागडुजीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:08 IST2019-07-26T15:52:22+5:302019-07-26T22:08:04+5:30
नांदेड - साळवा रस्ता : केव्हाही घडू शकते दुर्घटना

धोकादायक पुलाला डागडुजीचा आधार
नांदेड, ता.धरणगाव : या परीसरात २४ रोजीच्या रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड -साळवा रस्त्यावर गुंझारी भागात बांधलेल्या मोरीच्या दोन्ही बाजुकडील भाग खचल्याने हा पूल अतीशय धोकादायक झाला आहे. अशा स्थितीत केवळ मुरुम टाकून या ठिकाणी ‘मलमपट्टी’ केली असून केव्हाही हा भाग खचून मोठी दुर्घटना घडू शकते.
२४ रोजी रात्री हा पूल व रस्त्याचा दोन्ही बाजुचा भाग खचल्याने दुपारपर्यंत या मार्गावरील रहदारी ठप्प होती. हा रस्ता अतिशय वर्दळीचा असुन, याच वर्षी उन्हाळ्यात गुंझारी भागात रस्त्यावर मोरीचे बांधकाम करण्यात आले होते. २४ च्या रात्री झालेल्या दमदार पावसामुळे मोरीच्या दोन्ही बाजुच्या रस्त्याचा भाग पुर्णपणे खचल्याने रहदारी ठप्प झाली होती. पहिल्याच पावसात मोरी जवळील रस्त्याची ही स्थिती झाल्याने मक्तेदाराने केलेल्या कामाबाबत संशय व्यक्त होत आहे. दरम्यान दुपारी मोरीजवळच्या खचलेल्या भागावर दोन्ही बाजुस ट्रॅक्टरांद्वारे मुरूम टाकुन तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्यानंतर रहदारी पुर्ववत सुरु झाली. परंतु ही धोकादायक बाब असून याबाबत सार्वजनिक बाधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या भागाजवळ स्लॅप टाकुन दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी जनतेतुन केली जात आहे. अन्यथा हा रस्ता अधिक खचून मोठा अपघात होवू शकतो, यामुळे अनेकांचे बळीही जावू शकतात. तरी हा धोका टाळण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे.