बारामती पालिका जिंकण्याबाबत मागे हटणार नाही : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:19 IST2019-01-21T00:19:05+5:302019-01-21T00:19:33+5:30
अजित पवार यांचे वक्तव्य बालीशपणाचे

बारामती पालिका जिंकण्याबाबत मागे हटणार नाही : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
जामनेर, जि.जळगाव : जळगाव, धुळे महानगरपालिकेत भाजपला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले असून अहमदनगरची सत्ता भाजपकडे आहे. कामाच्या जोरावर भाजपची सर्वत्र विजयी आगेकूच सुरु आहे. बारामती पालिका जिंकण्याचे ध्येय आहेच, त्यात गैर काहीही नाही. पक्षाने आदेश दिल्यास मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी जामनेरात मांडली. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत सहभागी नेत्यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर चौफेर टीका केली. महाजन यांनी बारामती पालिके संदर्भात केलेल्या विधानाबाबतदेखील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी टीका केली होती.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही
राष्ट्रवादीच्या या नेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना महाजन यांनी सांगितले की, मतदारांमध्ये राष्ट्रवादीला जनाधार राहिला नसल्याने या पक्षाचे नेते बिनबुडाचे आरोप करीत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने बालीश आरोप करावे, याचेच आश्चर्य वाटते, अशी टिप्पणीही महाजन यांनी केली. ते पुढे म्हणाले की, राज्यात विरोधी पक्षांची स्थिती वाईट असून मतदारांमध्ये त्यांना विश्वासार्हता राहिलेली नाही. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. सरकारवर खोटे आरोप करुन मतदान मिळत नसते, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असेही आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले.
मतपत्रिकेद्वारेही मतदार विरोधकांना नाकारल्याशिवाय राहणार नाही
इव्हीएमबद्दल बालीश आरोप पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करावे याचेच आश्चर्य वाटते. इतरांच्या आरोपांची दखल घेण्याइतपत ते मोठे नाही. कोणत्याही निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेद्वारे मतदान घ्या, मतदार तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चुकीची माहिती देऊन दिशाभूल करु नका
जामनेर तालुक्यातील पाणी टंचाईबाबत चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल विरोधक करीत आहेत. यंदा कमी झालेल्या पावसामुळे टंचाई जाणवेल, मात्र सद्यस्थितीत तालुक्यात एकही टँकर सुरु नसताना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिशाभूल करणारे विधान विरोधक करीत असल्याने त्यांच्यावर मतदारांचा विश्वास नसल्याचेही महाजन म्हणाले.