एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बॅंकांचे व्यवहार होणार ठप्प; पाच दिवस सुट्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 15:13 IST2023-03-26T15:01:55+5:302023-03-26T15:13:22+5:30
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुट्या असल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बॅंकांचे व्यवहार होणार ठप्प; पाच दिवस सुट्ट्या
कुंदन पाटील
जळगाव : एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात पाच दिवस सुट्या येत असल्याने राष्ट्रीयकृत बॅंकांना सुट्या असतील. त्यामुळे मार्चअखेरीनंतरच्या पहिल्याच आठवड्यात अनेकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत.
यंदाचे आर्थिक वर्ष दि.३१ मार्च रोजी संपणार आहे. त्यादिवशी शुक्रवार आहे. त्यानंतर एप्रिल महिना उजाडेल. दि.१ रोजी शनिवार आहे. त्यामुळे बॅंकांना सुटी असेल. दि.२ रोजी रविवार असल्याने सार्वजनिक सुट तर दि.३ रोजी सोमवारी बॅंका उघडतील. त्यानंतर ४ मार्च रोजी महावीर जयंतीनिमित्ताने बॅंकांना सुटी आहे. दि.५ आणि ६ रोजी बॅंका सुरु असतील. दि.७ रोजी गुडफ्रायडेनिमित्त सुटी आहे. दि.८ रोजी शनिवार असल्याने सलग दोन दिवस सुट्या असतील. त्यामुळे दि.१ ते ८ या आठवड्यात फक्त तीन दिवस बॅंकांचे कामकाज सुरु राहणार आहे. दुसऱ्या आठवड्यातही दि.१४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यामुळे एक दिवस सुटीचा असेल. तर दि.२२ रोजी रमजान ईद व अक्षय्यतृतीयानिमित्त सुटी राहणार आहे. चौथ्या आठवड्यात मात्र आठही दिवस बॅंका सुरु राहणार असल्याने ग्राहकांची सोय होणार आहे.
तीन दिवस हातात!
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुट्या असल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. त्यामुळे काहींनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच व्यवहारांची पूर्तता करायला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या आठवड्यात व्यवहार आटोपण्यासाठी तीन दिवस हातात आहेत.