बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 23:27 IST2021-03-15T23:26:35+5:302021-03-15T23:27:30+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या १० लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १५ व १६ मार्च रोजी दोन दिवसीय संप पुकारला आहे.

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : येथे केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरणाचे धोरण आखल्याने त्याच्या निषेधार्थ देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या १० लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १५ व १६ मार्च रोजी दोन दिवसीय संप पुकारला आहे. शहरातील जामनेर रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊन कडकडीत संप पुकारला आहे.
बँकेच्या खासगीकरणामुळे ग्रामीण भागातील शाखा बंद होतील व शहरात केंद्रित होतील. लोकांच्या ठेवीवर व्याज कमी दिले जाईल. तसेच सेवा निवृत्ती पेन्शनधारक व ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर त्याचा परिणाम होईल. ग्रामीण भागातील शेतीला कमी कर्जपुरवठा होईल. छोट्या उद्योगांनाही कमी कर्जपुरवठा होईल. शैक्षणिक कर्जपुरवठा कमी होईल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाही. ग्राहकांना जास्तीत जास्त छुपे शुल्क द्यावे लागेल, आदी कारणांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने दोन दिवसीय संप पुकारला असल्याचे म्हटले आहे. शनिवारपासून सलग चार दिवस बँका बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्या या संपाचा शेवटचा दिवस असणार आहे.