केळी आणि पपईची झाडे अज्ञान व्यक्तींनी कापून फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:46 IST2020-06-07T13:43:50+5:302020-06-07T13:46:55+5:30
मुक्तळ येथे अज्ञात व्यक्तींनी केळी आणि पपई पीक कापून फेकले.

केळी आणि पपईची झाडे अज्ञान व्यक्तींनी कापून फेकली
बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील मुक्तळ येथे अज्ञात व्यक्तींनी केळीची दीड हजार खोडे आणि पपईची ८० फळ झाडे कापून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. यात सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुक्तळ या गावी राहत असलेल्या कुमुदिनी नारायण पाटील (वय ५९) आणि संध्या लीलाधर पाटील या सासू-सुनेने आपल्या शेतात केळी आणि पपईची लागवड केली आहे. मेहनतीने या पिकांना जगवले.
४ रोजी त्यांनी शेतातील कामे आटोपली आणि सायंकाळी घरी आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेतात गेले. पाहतात तर केळीची खोडे आणि पपईची झाडे जमिनीवर कोणीतरी कापून फेकल्याचे दिसून आले.
दोघांनी बारीक निरीक्षण केले तेव्हा पपई पिकाची सुमारे दीड हजार खोडे व पपईची सुमारे ८० फळझाडे कापून अज्ञात व्यक्तीने नुकसान केले आहे.
हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिरावला आहे. यात दोन ते तीन लाखाचे नुकसान केलेले आहे. याचा पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
या शेतकऱ्यांनी बोदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याभरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.