Bambarud's son became an IPS officer | बांबरुडचे सुपुत्र बनले आयपीएस अधिकारी

बांबरुडचे सुपुत्र बनले आयपीएस अधिकारी

ठळक मुद्दे आनंदोत्सव : भडगाव तालुक्यातील पहिले आयपीएसमाहिती बांबरुड गावात येताच आनंदोत्सव साजरा

प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या बांबरुड (पाटस्थळ), ता.भडगाव येथील सुपुत्र असलेले पुणे येथील पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारावर केंद्र शासनाने त्यांना भारतीय पोलीस प्रशासन दर्जाच्या (आयपीएस) सेवेत सामावून घेतले आहे. ही माहिती बांबरुड गावात येताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ते भडगाव तालुक्यातील पहिले आयपीएस अधिकारी आहेत.
२००२ मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उत्तीर्ण झाल्यानंतर २००३ मध्ये चंद्रपूर येथे रुजू झाले. २००५ ते २००८ पर्यंत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. नंतर पदोन्नतीवर अपर पोलीस अधीक्षक म्हणून उस्मानाबाद, बारामती, यानंतर सन २०१६ ते २०१८ मध्ये नागपूर येथे पोलीस उपायुक्त, यानंतर दहशवादविरोधी पथक (एटीएस) चे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. आपल्या आतापर्यंतच्या नोकरीत प्रथम नियुक्तीच्या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत आणि त्याच खडतर परिस्थितीत जनजागृतीचे मोठे कार्यक्रम घेत ४० नक्षलवाद्यांना शरण येण्यासाठी बाध्य केले. त्याच भागात पुराने वेढलेल्या गावातील लोकांना मदत पुरवत त्यांना वाचविण्याचे काम केले.
अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे, गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाया, ऊस आंदोलन शांततेने हाताळणे, नागपूर येथे वाहतूक शाखेत पोलीस उपायुक्त म्हणून काम करत असताना अनेक महत्वाचे उपक्रम राबविले. तेथे हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात संपूर्ण देशात कारमध्ये सीटबेल्ट लावण्यात नागपूर प्रथम आले. दारू पिऊन वाहन चालविण्याच्या बाबतीत २५ हजार वाहनचालकांवर कारवाई करून एक मोठी कारवाई केली गेली. हा मोठा विक्रम झाला. या पद्धतीने आपल्या कार्यकाळात एक वेगळी ओळख या अधिकाऱ्याने प्रत्येक नियुक्तीच्या ठिकाणी दाखविली. यासह विविध कामगिरीच्या आधारावर केंद्र शासनाने त्यांना भारतीय पोलीस प्रशासन दर्जाच्या (आयपीएस) सेवेत सामावून घेतले आहे.
ही माहिती बांबरुड (पाटस्थळ) गावात येताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दीड-दोन हजार लोकसंख्येच्या बांबरुड (पाटस्थळ) या गावातील शेतात रवींद्रसिंह परदेशी यांचे निवासस्थान आहे. येथे दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी परदेशी यांच्या मातोश्री व परिवाराचे अभिनंदन केले.

आज वडील असते तर...
आयपीएस म्हणून पदोन्नती मिळालेले रवींद्रसिंह परदेशी यांनी समाधान व्यक्त करताना आज वडील हयात असते तर त्यांचे स्वप्न खºया अर्थाने साकार झाले असते, अशी प्रतिक्रिया देत असताना त्यांना गहिवरून आले. वडिलांचे महिनाभरापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. माझ्या पाठीवर कौतुकाची थापसह आशीर्वाद देणाºया हातापासून मी वंचित राहिलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Bambarud's son became an IPS officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.