सामाजिक जाणीवांचा जागर करण्याचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:56 IST2020-01-12T12:56:20+5:302020-01-12T12:56:41+5:30
अवघ्या बारावीतच थक्क करणारी कामगिरी, गिरीश पाटील याची साहित्य, शिक्षण, पर्यावरण क्षेत्रात मुशाफिरी

सामाजिक जाणीवांचा जागर करण्याचा ध्यास
विजयकुमार सैतवाल
जळगाव : बारावीत शिकणारा मूलजी जेठा महाविद्यालयाचा एक विद्यार्थी...गिरीश पाटील त्याचे नाव. बारावीत शिकत असला तरी सामाजिक जाणीवांची मोठे भान त्याला याच वयात आहे. केवळ भान नाही तर समाजासाठी काहीतरी करायला हवं, केवळ आपणच पुढे जाऊन उपयोग नाही तर सर्व समाज पुढे गेला पाहिजे, याच्या ध्यासातून तो एवढ्याच वयात कामाला लागलाय. एकीकडे स्वार्थ वाढला असताना दुसरीकडे एक विद्यार्थी दशेतील तरूण देशाचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी पुढे येतो आहे, हे सुखद धक्का देणारे आहे.
गिरीश हा शिक्षण, पर्यावरण व मराठी साहित्य क्षेत्रात काम करतोय. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण जनजागृतीसाठी काम करणाऱ्या झिरो अवर-फ्रायडे फॉर फ्युचर चा भारताचा प्रमुख आहे. बालकुमारांची साहित्य अभिरुची वाढवण्यासाठी तो प्रयत्न करीत आहे.
संस्कृत भाषेचा प्रचारासाठी पुढाकार
संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठीही तो संस्कृतभारतीमध्ये सक्रीय असतो. त्याच्या समवयीन मुलांनाही सामजिक कार्याची आवड लागावी, या हेतूने त्याचे मित्र वरुण, तन्मय, श्रुती यांच्यासह त्याने ‘इथेरीयल’ नामक गटाची स्थापना केली आहे, ज्यामार्फत ते निर्माल्य संकलन आदींसारखे उपक्रम घेत असतो.
आॅगस्ट २०१९ मध्ये राज्य शासनाने युवा संसदेचे आयोजन केले होते. त्यात मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्याला मिळाला होता. शिवाय याच संसदेत ‘सर्वोत्कृष्ट युवा संसदपटू’चा रुपये एक लाखाचा पुरस्कारदेखील मिळाला होता.
वाघळूद ता. धरणगाव येथील रहिवासी असलेला गिरीश हा भारतीय छात्र संसदेच्या व्यासपीठावर तो न्यायिक व्यवस्थेवर व्याख्यानासाठी निमंत्रित होता.
एक गिरीश पुढे जाऊन देश बदलणार नाही. त्यासाठी अनेक युवकांनी पुढे यायला हवे अन राष्ट्रीय पुनर्निमार्णाच्या कार्यात स्वत:ला वाहवून घ्यायला हवे, असे युवक तयार व्हावेत यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे.
-गिरीश पाटील