महासभेनेही दिली आहे मंजुरी : मनपाकडून आठवडाभरात होणार प्रक्रिया पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाने आता मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत सर्व ठराव महासभेत मंजूर करून घेत, कारवाईसोबतच वसुलीचे कामदेखील सुरू केले आहे. महापालिकेकडे ताब्यात असलेल्या विविध मार्केटमधील १०० हून अधिक गाळ्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया मनपाकडून सुरू करण्यात आली असून, आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण करून या गाळ्यांचा लिलाव करण्याची तयारी मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
१२ ऑगस्ट रोजी झालेल्या महासभेत जे गाळे मनपाने ताब्यात घेतले असतील अशा गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. या गाळ्यांमध्ये गोलाणी मार्केटमधील काही सभागृह होते जे अनेक वर्षांपासून पडून आहेत. तर इतर मार्केटमधील काही गाळे मनपा प्रशासनाने ताब्यात घेतले होते. आता महासभेनेच ठराव केल्यामुळे या गाळ्यांचा लिलाव होण्याचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण करून, १०० गाळ्यांचा लिलाव करण्याची तयारी मनपाने केली आहे. लिलावाच्या माध्यमातून मनपाला उत्पन्नांचा नवा स्रोत निर्माण होऊ शकणार आहे.
नुकसानभरपाईच्या नोटिसा दिल्या जाण्याचे काम सुरू
मनपा प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना थकीत भाड्यापोटीची रक्कम न भरल्याने नुकसानभरपाईच्या नोटिसा देण्याचे काम सुरू आहे. या महिनाभरात हे कामदेखील मनपाकडून पूर्ण होणार असून, हे काम झाल्यानंतर नूतनीकरणाबाबत गाळेधारक पात्र की अपात्र याबाबतची सुनावणी प्रक्रिया मनपाकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मनपाकडून गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसूल करण्याचे कामदेखील सुरू असून, आतापर्यंत ७ कोटींची वसुली मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.