दडपलेला इतिहास ‘हे मृत्युंजय’ नाटकातून मांडण्याचा प्रयत्न - स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे नातू रणजित सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:32 IST2019-09-19T12:31:52+5:302019-09-19T12:32:00+5:30
आताच्या पिढीला खरा इतिहास सांगण्याची गरज

दडपलेला इतिहास ‘हे मृत्युंजय’ नाटकातून मांडण्याचा प्रयत्न - स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे नातू रणजित सावरकर
जळगाव : क्रांतिकारक हे काही वेडे नव्हते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आखलेल्या योजना आणि स्वत:च्या प्राणाची दिलेली आहुती, हा दडपलेला इतिहास आता पुढे येऊ लागला आहे आणि विशेष म्हणजे देश आता व्यावहारिक होत आहे. ही एक समाधानकारक बाब आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले.
‘हे मृत्यूंजय’ या नाटकाच्या निमित्ताने ते बुधवारी जळगावात आले. दुपारी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
क्रांतिकारकांच्या आयुष्यावर आणि त्यांनी घडवलेल्या क्रांतिकारी इतिहासावर ‘हे मृत्यूंजय’ हे नाटक आम्ही तयार केले आहे. खरा इतिहास हा आताच्या पिढीला शिकवला गेला पाहिजे, यासाठी हे नाटक आम्ही ठिकठिकाणी नव्या पिढीसमोर दाखवत आहोत. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. आताची पिढी बेजबाबदार आहे, असे म्हटले जाते. पण आताची पिढी उलट जास्त जबाबदारपणे वागत आहे. मात्र ती भरकटता कामा नये. त्यामुळे त्यांच्यासमोर खरा इतिहास आला पाहिजे, यासाठी ‘हे मृत्यूंजय’ हे नाटक आम्ही तरुणांपर्यंत पोहोचवत आहोत. सावरकरांचा इतिहास या नाटकातून मांडण्यात आला आहे. सावरकर यांना द्दष्टी होती, उंची होती. या नाटकातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या आयुष्याची उंंची वाढवावी, असे आवाहन सावरकर यांनी केले. शासनाने येथील तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा, खरा इतिहास अभ्यासक्रमात अंतर्भूत केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही तर आपण ते मिळवले आहे, हे तरूणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. भारतावर तुर्क, मुघल व नंतर ब्रिटीशांनी राज्य केले. त्यामुळे ७०० वर्षे भारतीय स्वातंत्र्यलढा चालला आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. इतिहास हा बदलत नाही. पण त्याचे प्रकटीकरण केले जाते. त्यामुळेच दुर्लक्षित राहिलेला क्रांतिकारकांचा इतिहास आता नव्याने पुढे येत आहे. क्रांतिकारकांचा इतिहास हा आताच्या तरूणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.
यावेळी सावरकर यांच्यासोबत वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे याही उपस्थित होत्या.
सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यासमोर असा धगधगता इतिहास मांडला तर त्यांना मनोबल मिळू शकेल. क्रांतिकारकांच्या इतिहासापासून त्यांना प्रेरणा मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे दैवत म्हणून न पाहता त्यांच्या योजनांकडे, त्यांच्या दूरद्दष्टीकडे पहावे, असे ते म्हणाले.
हे मृत्यूंजय नाटकाचे जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ३ आणि दिल्ली विद्यापीठात एक प्रयोग झाल्याचे ते म्हणाले.