जळगावातील ग.स.सोसायटीतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:43 IST2018-02-15T22:41:12+5:302018-02-15T22:43:11+5:30
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने लोकमान्य गटाच्या उपोषणाची सांगता

जळगावातील ग.स.सोसायटीतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आश्वासन
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१५ : ग.स.सोसायटीमधील गैरव्यवहाराबाबत लोकमान्य गटाचे गटनेते मगन पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तीन दिवसीय उपोषण सुरु केले होते. मात्र जिल्हा उपनिबंधक यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.
ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष व गटनेते मगन पाटील यांनी सोसायटीमधील गैरव्यवहार व मनमानी कारभाराविरोधात तीन दिवसीय उपोषणाला गुरुवारपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरुवात केली. उपोषणात मगन पाटील यांच्यासह राजेंद्र साळुंखे, रावसाहेब पाटील, शरद पाटील, व्ही.एम.पाटील, योगेश सनेर, राजेंद्र सोनवणे, शिवाजी पाटील, सर्जेराव बेडीस्कर, पी.एन.पाटील, समाधान पाटील, प्रवीण कोळी, दीपक गिरासे, प्रकाश सूर्यवंशी, भास्कर सोनार, जी.सी.पाटील, एन.एस.ठाकरे यांनी सहभाग नोंदविला.
संध्याकाळी साहाय्यक निबंधक डी.ए.शेळके, अनिल भोसले, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक डी.जी.दोरकर यांनी गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
सहकार मंत्र्यांनी मागविला अहवाल
मगन पाटील यांनी ग.स.सोसायटीमधील गैरव्यवहारासंदर्भात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. देशमुख यांनी तक्रारीची दखल घेत या प्रकरणी उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिले आहेत.