कपाशीसह ट्रक लांबवणाऱ्यास अटक : धरणगाव पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 14:28 IST2020-11-13T14:27:35+5:302020-11-13T14:28:33+5:30
एका व्यापाऱ्याचा तब्बल साडेसात लाख रुपयांच्या कपाशीने भरलेला ट्रक लांबविणाऱ्याला धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात गुजरातमधून अटक केली.

कपाशीसह ट्रक लांबवणाऱ्यास अटक : धरणगाव पोलिसांची कारवाई
धरणगाव : येथील एका व्यापाऱ्याचा तब्बल साडेसात लाख रुपयांच्या कपाशीने भरलेला ट्रक लांबविणाऱ्याला धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात गुजरातमधून अटक केली. ऐनदिवाळीच्या वेळी मोठे नुकसान टळल्यामुळे व्यापाऱ्याने धरणगाव पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, भरतभाई अंबाबाई मंगू किया (वय ४८, रा.न्यू कतारगा वरीयार रोड, सुरत), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
येथील कापूस व्यापारी सुनील विठ्ठल वाणी (रा. दत्त दुर्गानगर) यांनी निमखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकऱ्याकडून साडेसात लाखांचा १४१ क्विंटल कापूस खरेदी केला होता. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी हा कापूस त्यांनी आदर्श ट्रान्सपोर्टचे मालक हसीन रशीदखान बेळगाववाला यांच्यामार्फत ट्रक (क्रमांक जीजे-११-व्हीव्ही-८८०५) यात भरून गुजरात राज्यातील अमेरीली जिल्ह्यात विक्रीसाठी महावीर कोटींचे मालक व तेथील व्यापारी योगेशभाई यांच्याकडे पोहोचविण्यास सांगितले होते. दि.९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुनील वाणी यांच्या लक्षात आले की, ट्रकचालक व मालकाशी संपर्क होत नाही. त्यांनी याबाबत ट्रान्सपोर्टचे मालक हसीन बेळगाववाला यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ट्रान्सपोर्टमालकांनी सांगितले की, त्यांचादेखील ड्रायव्हर व गाडीमालक यांच्याशी होत संपर्क नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत सुनील वाणी यांची खात्री झाली की, त्यांचा कापूस चोरीला गेला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जे.एम.हिरे यांची भेट घेत, हकीगत सांगितली. हिरे यांनी तत्काळ फिर्याद नोंदवून घेत रात्रीच तपास पथकाला गुजरातकडे रवाना केले. या पथकात पीएसआय अमोल गुंजाळ, पोहेकॉ खुशाल पाटील, उमेश पाटील यांचा समावेश होता.
दि.१० नोव्हेंबर रोजी धरणगाव पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील बेडवान शिवार, ता.डेडीयापाडा भागात आरोपीचा शोध घेऊन एकाला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण १४१ क्विंटल कापूस काढून दिला. याप्रकरणी भरतभाई अंबाबाई मंगू किया (वय ४८, रा.न्यू कतारगा वरीयार रोड, सुरत) याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान, व्यापाऱ्यांनी त्यांचा माल तर राज्यात विक्रीसाठी पाठविताना ट्रकचालक-मालक कागदपत्रे इत्यादींची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.