पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:46 IST2019-03-04T00:46:21+5:302019-03-04T00:46:38+5:30
अमळनेरात तणावपूर्ण शांतता

पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यास अटक
अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि हिंदू संघटनांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. यामुळे अनर्थ टळला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे
रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे शहरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर व्हिडीओमध्ये एक इसम पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप आणि हिंदू संघटनांना शिवीगाळ केली. त्यात त्याने स्वत:चे नाव मिथून ओवेसी असे सांगत होता आणि एमआयएम नेता ओवेसीचे नावही घेतले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच शहरात तणाव निर्माण झाला. भाजप आणि बजरंग दल व इतर हिंदू संघटनांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्या वेळी डीवायएसपी रफीक शेख, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, शरद पाटील यांना पाठवून माजी नगरसेवक फिरोज मिस्त्री यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वत:चे नाव अमिनोद्दीन चिरागोद्दीन शेख नाव असल्याचे सांगितले.
भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख यांच्या फिर्यादीनुसार आरोपी अमिनोद्दीन याच्याविरुद्ध भादवी २९४, १५३, सायबर गुन्हे कलम ६६ अ, ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.