आपत्कालीन परिस्थितीस ८ हजार बेडची व्यवस्था - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 12:41 IST2020-04-28T12:41:00+5:302020-04-28T12:41:51+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांशी संवाद

आपत्कालीन परिस्थितीस ८ हजार बेडची व्यवस्था - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्कालीन स्थिती उद्वभल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात ८ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. १ मे रोजी जिल्ह्याच्या खरीप हंगामाचा आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पाटील यांनी कापूस लागवड संदर्भात सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा घेतला. कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी कापूस बियाणे उपलब्धतेविषयी व लागवडी बाबत बोलणे झाले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यादरम्यान जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कृषी केंद्रांवर शेतकºयांसाठी कापूस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली.
शेतकºयांना कापुस बियाणे जरी लवकर उपलब्ध झाली तरी बागायती कापूस लागवड २५ मे नंतरच करावी. असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले़ यासह शेतकºयांनी मान्यताप्राप्त कृषी केंद्रावरून कापसाचे बियाणे खरेदी करावे, असे आवाहनही त्यांनी केले़
प्रयोगशाळेचे काम ८० टक्के
संशयितांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी प्रयोगशाळेचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून त्या संबधित मशीनरी येताच संशयित कोरोनाग्रस्तांचे स्वॅब तपासणीची सोय जिल्ह्यातच कार्यन्वित होईल. जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांसाठी व्हेंटीलेटरची आवश्यकता असल्याने जिल्ह्यातील दानशुर व्यक्तींनी पुढे येवून रूग्णांसाठी व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्यास मदत करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले़