Apostle: Principal of equality and preacher of brotherhood | प्रेषित : समतेचे आचार्य आणि बंधूभावाचे प्रचारक

प्रेषित : समतेचे आचार्य आणि बंधूभावाचे प्रचारक

१० नोव्हेंबर ईस्लामी तिथीप्रमाणे १२ रबीऊल अव्वल अर्थात प्रेषित हजरत मुहम्मद (स.अ.) यांची जयंती, ईद ए मिलादुन्नबी म्हणून ती जगभरात साजरी केली जाते.
प्रसिद्ध इतिहासकार मायकल एच. हार्ट यांनी जगाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली ठरलेल्या १०० व्यक्तिमत्वाची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’च्या नावाने प्रसिध्द केली आहे. यात यादीत पहिले स्थान प्रेषित मुहम्मद यांना देण्यात आले आहे. यावर स्पष्टीकरण तो म्हणतो, मी केलेल्या प्रेषित मुहम्मदांच्या निवडीने काहींना आश्चर्य झाले असून आणि काहींना प्रश्न पडले असतील; परंतु प्रेषित मुहम्मंद इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत, जे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही मैदानात एकाचवेळी सरस ठरले आहेत.
प्रेषित मुहम्मद यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारिक संदेश दिला. केवळ २३ वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखवला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजाण देण्याचा आदेश देऊन कोणतीच व्यक्ती अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले की, आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवित आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत. एकाच मानवाची संतान आहेत.’ सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिध्दांतापैकी आहे. जन्म, रंग, वर्ण, वंशाच्या आधारावर केला जाणारा भेद इस्लामला मान्य नाही. सर्वांना समान हक्क, समान संधीची घोषणा प्रेषितांनी १४०० वर्षांपूर्वी केली आणि समानतेवर आधारित समाजाची स्थापना या जगाला करून दाखवली. प्रेषित मुहम्मद समतेचे आचार्य आणि मानवजातीतील बंधूभावाचे प्रचारक होते.
प्रेषित मुहम्मंदांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान अधिकार देऊन टाकले. प्रेषित मुहम्मंदानी आईला हा दर्जा दिला की, धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला की, तुमच्यापैकी सर्वोत्तम तो आहे. तो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे. मुलीला हे स्थान दिले की, ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पध्दतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल, अशी शिकवण प्रेषितांनी दिली.
व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ १० वर्षाच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखवली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. पैसे उधार देऊन सोडून देऊ लागले. गरिबांना आणि गरजूंना मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येऊ दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहता आर्थिकदृष्ट्या इतका सधन संपन्न झाला की, ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रीचा नाश झाला.
प्रत्येक मुस्लिमसाठी शिक्षण प्राप्त करणे अनिवार्य असल्याचा आदेश प्रेषितांनी दिला. आपल्या अनुयायांवर शिक्षणाची सक्ती केली. याप्रकारे प्रेषितांनी मुस्लिम समाजाला प्रत्येक क्षेत्रात केवळ १० वर्षाच्या कालखंडात अग्रेसर करून ठेवले. प्रेषित मुहम्मद जगातील इतिहासात सर्वाधिक प्रभुत्वशाली व्यक्तिमत्व होते. आपल्या सिध्दांताच्या माध्यमातून ते जगावर आपल्या ‘न भूतो न भविष्यती’ प्रभाव टाकला आहे.

- काझी मुजम्मीलोद्दीन नदवी,
सहाय्यक प्राध्यापक, एच. जे. थिम महाविद्यालय, जळगाव

Web Title:  Apostle: Principal of equality and preacher of brotherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.