तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 22:25 IST2019-11-05T19:35:22+5:302019-11-05T22:25:09+5:30
काँग्रेस पक्षातर्फे निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा
जळगाव- अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी राजाला नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता काँग्रेसपक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालसमोर निदर्शने करण्यात आली.
ऐन दिवाळीत बरसलेल्या अवकाळी शेतातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारीसारखे पीक हातातून गेले. राज्यातील शेतकरी परत संकटात आला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांना कोंबदेखील फुटले आहेत. अतिवृष्टीमुळे कापसाच्या झाडाचे खराटे झाले. शेतीसाठी लागलेला खर्चही शेतक-याला निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी राजा हा मोठ्या संकटात सापडला असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांकडून मंगळवारी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेण्यात आली़ त्यानंतर त्यांनी चर्चा करीत निवेदन दिले़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
सरसकट कर्ज माफी द्या
ओला दुष्काळ जाहीर झालाचं पाहीजे, शेतकºयाला सरसकट कर्ज माफी दिली पाहीजे, जॉब दो नही तो जबाब दो, केंद्र सरकार हाय-हाय, बढती मंदी जाता रोजगार, कृषी वीजबील माफ झाले पाहीजे, अशा जोरदार घोषणाबाजी जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांकडून देण्यात आल्या़ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते़ यावेळी निदर्शनात जळगाव जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी हेमलता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हास पाटील, आमदार शिरिश चौधरी, पदवीधर शिक्षक आमदर सुधीत तांबे, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश सचिव डी़जी़ पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सेवादल जिल्हाध्यक्ष राजस कोतवाल, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, ज्ञानेश्वर महाजन, प्रदीप सोनवणे, बंटी पाटील, आत्माराम जाधव, अकीब खान यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
अशा आहेत मागण्या
शेतक-यांच्या समस्या तसेच महागाई कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, सरकारी नोकरींमधील रिक्तपदे भरून बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी द्यावा, कर्जमाफी द्यावी, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.