अनिल गोटे यांनी डिपॉजिट वाचवून दाखवावे - धुळ्यातील सभेत गिरीश महाजन यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:17 IST2019-04-10T12:16:52+5:302019-04-10T12:17:22+5:30

काँग्रेस-राष्टÑवादीतून इनकमिंग सुरूच

Anil Gote should save the deposit - Girish Mahajan's challenge in Dhule assembly | अनिल गोटे यांनी डिपॉजिट वाचवून दाखवावे - धुळ्यातील सभेत गिरीश महाजन यांचे आव्हान

अनिल गोटे यांनी डिपॉजिट वाचवून दाखवावे - धुळ्यातील सभेत गिरीश महाजन यांचे आव्हान

धुळे : महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांचा केवळ एक उमेदवार निवडून आला. आता ते लोकसभेची निवडणूक लढवित असून, त्यांनी आपले डिपॉजिट (अनामत रक्कम) वाचवून दाखवावे, असे आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार गोटे यांना दिले आहे. आतापर्यंत कॉँग्रेस-राष्टÑवादीतील अनेक मोठे नेते भाजपात आले असून, येत्या काही दिवसात अजून काहीजण भाजपात प्रवेश करतील असे सूचक विधानही त्यांनी केले.
धुळे लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गरूड बाग परिसरात झालेल्या सभेत ना.महाजन बोलत होते.
व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा प्रवक्ते संजय शर्मा, बाजार समिती सभापती सुभाष देवरे आदी उपस्थित होते.
गिरीश महाजन म्हणाले, आकडा फिक्स करण्याची मला सवय आहे. नाशिक, जळगाव,धुळे महापालिकेत भाजपला किती जागा मिळतील हे सांगितले होते. त्यानुसार पक्षाला जागा मिळाल्या. धुळे मनपा निवडणुकीच्यावेळी आमदार गोटे यांना भोपळा फोडता येणार नाही असे सांगितले होते. मात्र त्यांची एक जागा निवडून आली. आता ते लोकसभा निवडणूक लढवित आहेत. उमेदवारी अर्ज मागे न घेता, त्यांनी डिपॉझिट वाचवून दाखवावे असे खुले आव्हान त्यांनी धुळ्यातच दिले. उत्तर महाराष्टÑातून युतीचे ८ खासदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयकुमार रावल म्हणाले महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आली असून, जिल्हा परिषदेवरही भगवा फडकेल. देश वाचवायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. विनोद तावडे म्हणाले, मोंदींना हरविण्यासाठी ५६ पक्ष एकत्र आले आहे. मात्र त्यांचे आम्ही ‘अब तक छपन्न’ करू.
मोदींमुळे कॉँग्रेसच्या अनेकांची निवडणुक लढविण्याची तयारी नाही. मात्र हायकमांडच्या आदेशानुसार ते निवडणूक लढवित आहेत.
पाकिस्तानला केवळ मोदीच धडा शिकवू शकतात असे त्यांनी सांगितले. तर जो विधानसभा मतदारसंघ सर्वात जास्त लीड देईल त्याला सर्वाधिक निधी मिळावा अशी अपेक्षा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
सुभाष देवरे यांनी सांगितले की गेल्या दोन वेळेच्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसमुळेच भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी आता धुळे तालुक्यातून भाजपाला मताधिक्य मिळवून देऊ असे सांगितले.
सभेला भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, मनोज मोरे, हिरामण गवळी, नगरसेविका प्रतिभा चौधरी, बापू खलाणे, अ‍ॅड. माधुरी बाफना, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
शिवसेनेचे पदाधिकारीही व्यासपीठावर
निवडणुकीसाठी भाजप-सेना युती झाली तरी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. एक-दोन जणांनी थेट आघाडीशी जवळीक केल्याने शिवसेनेची नेमकी भूमिका काय याविषयी उत्सुकता होती. मात्र आजच्या सभेत शिवसेनेचे महेश मिस्तरी वगळता प्रा. शरद पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, ग्रामीणचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, युवा सेनेचे अ‍ॅड.पंकज गोरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. युती अभेद्य असल्याचा संदेश या नेत्यांनी उपस्थितीतून दिला.
मोदींची प्रतिकृती... या सभेच्यावेळी हुबेहुब नरेंद्र मोदींसारखे दिसणारे विकास महंते (मुंबई) हे व्यासपीठावर आले. त्यांनी मोंदीप्रमाणेच नागरिकांना अभिवादन केले. तेव्हा उपस्थितांनी मोदी मोदींच्या घोषणा दिल्या..
सुभाष देवरे यांचा भाजपात प्रवेश
या सभेच्या दरम्यान धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे यांनी भाजपात प्रवेश केला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: Anil Gote should save the deposit - Girish Mahajan's challenge in Dhule assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव