संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:15 IST2018-05-24T00:15:45+5:302018-05-24T00:15:45+5:30
वडगाव आंबे : ग्रामपंचायतीने ठराव करून पोलिसांना निवेदन दिल्यानंतरही अवैध धंदे बंद होईना

संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या
आॅनलाईन लोकमत
पाचोरा, जि.जळगाव, दि. २३ : तालुक्यातील वडगाव आंबे येथे राजरोसपणे सुरू असलेले दारू, सट्टा, पत्ता असे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे या मागणीसाठी संतप्त महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून हल्लाबोल केला.
वडगाव आंबे ग्राम पंचायतीच्या जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामसभेत संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे व ठारावाची प्रत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यातच कारवाई करण्यासाठी देण्यात आली आहे. परंतु कारवाई न झाल्याने ग्रामपंचायतीने एप्रिलमध्ये जळगाव येथे पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक यांनाही पत्र देऊन कारवाई करण्यासाठी विनंती केली. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ग्रामसभेने अवैध धंदे बंद करण्याचा ठराव करून व संबंधितांना लेखी देऊनही कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या महिलांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.
जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्याची व व्यसनाधिनतेने अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची वाट पाहू नये अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त महिलांनी यावेळी दिला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच, उपसरपंच, सदस्य आले. त्यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले. गावात महिला पोलीस पाटील रेखा वाघ असल्यावरही त्या न येता त्यांच्याऐवजी त्यांचे पती आल्याने महिलावर्गाने नाराजी व्यक्त केली. या ठिय्या आंदोलनात रंजनाबाई पाटील, शांताबाई सूर्यवंशी, गीताबाई पाटील, सिंधूबाई हडप, केदाबाई हटकर, सुरेखा जैन, सुनबाई मराठे यांच्यासह अनेक महिला व पुरुष सहभागी झाले. या वेळी उपसरपंच अॅड.मगेश गायकवाड, पीतांबर सपकाळे व महिलांनी पोलीस प्रशासनावर आरोप केला.