अपंग विधवा महिलेला खान्देश सुरक्षा संस्थेचा अमृताचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:01+5:302021-08-19T04:21:01+5:30
अमळनेर : दैवाने अपंगत्व दिलं...सासू गेली...नवराही गेला... एकमेव आधार असलेला कमावता मुलगाही गेला...जगण्याचा आधार गेला ...देशाचे सुपुत्र असलेल्या ...

अपंग विधवा महिलेला खान्देश सुरक्षा संस्थेचा अमृताचा आधार
अमळनेर : दैवाने अपंगत्व दिलं...सासू गेली...नवराही गेला... एकमेव आधार असलेला कमावता मुलगाही गेला...जगण्याचा आधार गेला ...देशाचे सुपुत्र असलेल्या खान्देश सुरक्षा रक्षक संस्थेने लोकमत वृत्ताची दखल घेऊन आर्थिक मदतीचा आधार दिला.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी जणू काही त्या निराधार महिलेला अमृतच मिळाले.
अमळगाव येथील सुतार कुटुंबात अवघ्या सहा महिन्यात एका अपंग महिलेने सासू आणि पती गमावला. एकुलता एक मुलगा रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका करीत होता. मात्र दुर्दैवाने दहा दिवसांपूर्वी त्याचाही अपघातात मृत्यू झाला. त्या अपंग मातेवर जगण्याचे संकट कोसळले. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत देशाचे सुपुत्र असलेले सैन्य दलातील कर्मचारी व सेवानिवृत्त जवान यांच्या खान्देश सुरक्षा रक्षक या संस्थेद्वारे गरीब व विधवा अपंग व बेसहारा आईला आर्थिक मदत ३२ हजार १०१ रुपये देण्यात आले.
संस्थेचे संस्थापक सचिन पाटील, तालुक्याचे अध्यक्ष विवेक पाटील व उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी, कार्याध्यक्ष महेंद्र बागूल, भूषण पाटील, कार्यरक्षक आणि एकूण १३५ रक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली. कार्यक्रमाला संजय पाटील, तसेच संस्थेचे मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी, विलास महाले, किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, तलाठी पराग पाटील, सरपंच छाया वसंत मोरे, रवींद्र शामराव कोळी, ग्रा.पं. सदस्य, गुलाब रघुनाथ कोळी, ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी यांनी गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले.
180821\18jal_6_18082021_12.jpg
अपंग विधवा महिलेला खान्देश सुरक्षा संस्थेचा अमृताचा आधार