२०पासून तीन दिवस अमळनेर कडकडीत बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:49 IST2021-03-18T16:47:37+5:302021-03-18T16:49:33+5:30
२० आणि २१ मार्च रोजी अमळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश इंसिडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत.

२०पासून तीन दिवस अमळनेर कडकडीत बंद!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने २० आणि २१ मार्च रोजी अमळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश इंसिडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत तर २२ रोजी पालिकेने जनता कर्फ्यू आणि ‘नो व्हेईकल डे’चे आदेश दिल्याने सतत तीन दिवस अमळनेर बंद राहणार आहे.
दररोज शहराच्या विविध भागात अँटीजन चाचण्या केल्या जात असताना बाजारात अधिक प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने साखळी तोडण्यासाठी सीमा अहिरे यांनी हा निर्णय घेतला आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची असणार आहे.
काय राहील बंद!
२० व २१ रोजी सर्व बाजारपेठ, किराणा दुकान, किरकोळ भाजीपाला खरेदी विक्री, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सभा, कार्यक्रम, मेळावे, बैठक, शॉपिंग मॉल, सलून, पानटपरी, हातगाड्या, हॉटेल, बगीचा, व्यायामशाळा, नाट्यगृह लिकर शॉप्स, सर्व काही बंद राहणार आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५च्या कलम ५१ ते ६०नुसार, भादंवि १८६०च्या ४५ कलम १८८प्रमाणे व फौजदारी संहिता १९७३च्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
काय सुरू राहील
खाद्य पार्सल सेवा, दूध विक्री, अम्ब्युलन्स सेवा, औषधी दुकाने, दवाखाने, आपत्ती व्यवस्थापन घटक आदी सेवा सुरू राहणार आहेत.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सोमवारी २२ रोजी आठवडे बाजार तर पालिकेच्या उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या आदेशाने जनता कर्फ्यूचे व ‘नो व्हेईकल डे’चे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी २२ मार्च रोजी दूध, कृषी व्यवसाय आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीही तीन दिवस बंद
शनिवार रविवारी दोन दिवस कडकडीत बंद असल्याने व सोमवारी जनता कर्फ्यु असल्याने तीन दिवस प्रशासनाला सहकार्य करत बाजार समितीतील खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी नियमितपणे बाजार समिती सुरू होईल, अशी माहिती सहसचिव बाळासाहेब शिसोदे यांनी दिली.