जिल्हा बँकांमधीलही घोटाळे उघड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:52+5:302020-12-04T04:42:52+5:30

जळगाव : सहकारी बँका असो अथवा पतसंस्था असो याविषयी पक्ष, नेते हे प्रत्येकवेळी आपल्या सोयीने चर्चेचे गुऱ्हाळ उभे करतात. ...

Also expose scams in district banks | जिल्हा बँकांमधीलही घोटाळे उघड करा

जिल्हा बँकांमधीलही घोटाळे उघड करा

जळगाव : सहकारी बँका असो अथवा पतसंस्था असो याविषयी पक्ष, नेते हे प्रत्येकवेळी आपल्या सोयीने चर्चेचे गुऱ्हाळ उभे करतात. त्यासाठी या सर्व संस्थांमधील सत्य जनतेसमोर येण्यासाठी एकदाच सर्व चौकशा लावा व जिल्हा बँकांमधीलही घोटाळे उघड करा, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लगावला आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेतील अपहार व इतर कारणांमुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावात चौकशी करण्यात आली. त्यानंतर या संस्थेतील घोटाळा ११०० कोटी रुपयांच्यावर असल्याचा आरोप माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. त्या नंतर प्रवीण दरेकर यांनी याला उत्तर देत राज्य सहकारी बँकेचा कारभार व जिल्हा बँकांमधील गैरव्यवहार या वरून खडसे यांना टोला लगावला.

सध्या खडसे यांना काम नाही

एकनाथ खडसे यांनी बीएचआरप्रकरणी आरोप केल्यानंतर दरेकर म्हणाले की, खडसे यांना सध्या काम नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी आरोप करणे स्वाभाविक आहे. यामध्ये जे चौकशीत आहे, त्याचा निष्कर्ष समोर येईलच. कोणाला पाठीशी घालायचा विषयी नाही, असे दरेकर यांनी सांगत एक प्रकारे भाजप नेत्यांच्या नावाविषयी असलेल्या चर्चेबाबत स्पष्टीकरणच केले.

५०० कोटींचे कारखाने १०-१५ कोटींना विकले

खडसे यांनी ११०० कोटींच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्याचा जो आरोप केला आहे, त्या माध्यमातून मला खडसे यांना विचारायचे आहे की, राज्य सहकारी बँकेने कारखाना विकताना काय केले, असा सवाल दरेकर यांनी केला. हे कारखाने लिलावात काढताना ५००-५०० कोटींचे कारखाने १० ते १५ कोटींना विकले, त्याचीदेखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

सहकारी बँकांची स्थिती पाहिली तर वर्धा बँक, नागपूर बँक अशा असंख्य बँका डुबल्या. राज्य सहकारी बँकेने जेथे कर्ज दिले तेथे फक्त जागा असून प्रकल्प अस्तित्वात नाही, अशा प्रकल्पांना या बँकेने कर्ज दिल्याचा आरोप दरेकर यांनी केला.

सर्व जिल्हा बँकांची चौकशी करा

राज्यातील सर्व जिल्हा बँक, अर्बन बँक, पतसंस्था, सहकारी बँका ज्यांचे-ज्यांचे घोटाळे आहे, त्या सर्व मग त्या कोणत्याही पक्षाच्या असू द्या, त्यांची एकदाच चौकशी लावा व सत्य समोर येऊ द्या, असे आव्हानही दरेकर यांनी दिले.

आपल्या सोयीचे चर्चेचे गुऱ्हाळ

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांच्या पक्षांतराबद्दल अप्रत्यक्षपणे टीका करताना दरेकर म्हणाले की, प्रत्येकवेळी पक्ष, नेते आपल्या सोयीने चर्चेचे गुऱ्हाळ उभे करतात. यासाठी एकदा सर्व सहकारी बँकांची चौकशी होऊच द्या व सर्व सत्य जनतेसमोर येऊ द्या, असे आव्हानही त्यांनी दिले.

Web Title: Also expose scams in district banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.