जळगाव जिल्ह्यात वाघूर, तापी नदी काठावर सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:48+5:302021-09-08T04:21:48+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वाघूर व हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे धरणांच्या पातळीत चांगलीच वाढ ...

जळगाव जिल्ह्यात वाघूर, तापी नदी काठावर सतर्कतेचा इशारा
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वाघूर व हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे धरणांच्या पातळीत चांगलीच वाढ होत आहे. हतनूर धरणारे मंगळवारी दुपारी ४ वाजता १४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून वाघूर धरणाचेही दरवाजे केव्हाही उघडे करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघूर व तापी नदीकाठावर प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात ११.३ मि.मी. पाऊस झाला असून दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरला.
वाघूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अजिंठा डोंगररांगामध्ये व जामनेर तालुक्यात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वाघूर धरणात गेल्या सहा दिवसांपासून दररोज वाढ होत असून मंगळवारी धरणसाठा ७४.९१ टक्क्यांवर पोहचला आहे. वाघूर धरणाची पाणी पातळी मंगळवारी दुपारी तीन वाजता २३२.३५० मीटरवर पोहचली.
या सोबतच हतनूर धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होऊन तापी, पूर्णा नदीद्वारे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे दुपारी ४ वाजता उघडण्यात आले असून धरणातून ५४ हजार ४२० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे वाघूर व तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला असून नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये असेही आवाहन केले आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ११.३ मि.मी पावसाची नोंद झाली असून दुपारपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होत आहे.