शेती आता सातबारावरच, पुरानंतर उरले फक्त दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:58+5:302021-09-05T04:19:58+5:30
चाळीसगाव : कन्नड घाटातून उगम पावलेल्या डोंगरी नदीने ३१ ऑगस्ट रोजी रौद्ररूप धारण केले होते, दर दोन मिनिटाला तिची ...

शेती आता सातबारावरच, पुरानंतर उरले फक्त दगड
चाळीसगाव : कन्नड घाटातून उगम पावलेल्या डोंगरी नदीने ३१ ऑगस्ट रोजी रौद्ररूप धारण केले होते, दर दोन मिनिटाला तिची पाणी पातळी पाच ते सात फुटांनी वाढत होती. पहाटे ४ वाजता नदी काठालगतच्या शेतातील पिकांसह मातीही वाहून गेल्याने आता फक्त दगड उरले आहे. यावर शेती करायची कशी? या प्रश्नाने शेतकरी हादरून गेले आहे. शासनाने नुसते पंचनामे न करता शेतांमध्ये मातीचा भराव टाकण्यासाठीही मदत दिली पाहिजे, असा टाहो विश्वजित दौलत बागुल या शेतकऱ्याने फोडला आहे.
‘लोकमत’ने पूरग्रस्त भागाचा आॕन दी स्पाॕट आढावा घेणे सुरू केले आहे. ३० व ३१ ऑगस्ट चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुराने वाकडी गावात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. चाळीसगाव शहरापासून केवळ सहा किमी अंतरावर असणाऱ्या या गावात ३०ची रात्र आणि ३१ रोजीची पहाट ‘काळ’ बनून आली होती. याच गावात पुराच्या पाण्यात वाहिल्याने ६० वर्षीय कलाबाई सुरेश पांचाळ या महिलेचा मृत्यू झाला. दावणीला बांधलेल्या लहान-मोठ्या ३१४ गुरांनाही पुराच्या पाण्याने गिळून टाकले. पूर ओसरल्यानंतर त्याने दिलेल्या जखमा भयावह असून, अनेक शेतकरी उघडे पडले आहे. शेतकऱ्यांना सावरण्याची नितांत गरज आहे.
चौकट
अन् पाच जणांचा जीव फक्त वाचला
विश्वजित दौलत बागुल यांची रस्त्यालगत डोंगरी नदीच्या काठी दहा एकर शेती आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे फारसे उत्पन्न मिळाले नाही. यावर्षी खरिपाची लागवड करताना त्यांनी कर्ज काढून नांगर जुंपला. कपाशी आणि मका पिकाची लागवड केली. मध्यंतरी पावसाने ओढ घेतल्याने पिकांची स्थिती जेमतेमच होती. शेतातच घर बांधून ते आपल्या पाच व सहा वर्षीय दोन मुली, २० वर्षांचा भाचा ३० वर्षीय पत्नी आणि ६० वर्षीय आईसोबत राहतात.
१...३० ऑगस्ट रोजी सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. ३१ रोजी पहाटे ४ वाजता विश्वजित यांच्या घराची एक भिंत कोसळून कंबरेपर्यंत आत पाणी शिरले. अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण कुटुंब चांगलेच भांबावले. त्यांची पत्नी गरोदर आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यातून त्यांना पाच जणांचे जीव तेवढे वाचवता आले.
२...शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने फक्त दगड उरले असून, संसारही पुराच्या आक्राळ-विक्राळ जबड्यात नाहीसा झाला. विश्वजित व त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. आपली व्यथा सांगताना विश्वजित यांचे डोळेसारखे वाहत राहतात. वडील रडताहेत म्हणून चिमुकल्या मुलीही रडू लागतात. त्यांची वयोवृद्ध आईदेखील या अस्मानी प्रकोपाने हबकून गेली आहे. नदी काठालगत असणाऱ्या शेतींची अशीच वाताहत झाली असून, दीडशे एकरवरील पिके पुरात स्वाहा झाली आहेत.
चौकट
शेती तयार करण्यासाठी मदत द्यावी पिकांसह मातीही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुन्हा शेती तयार करण्यासाठीही शासनाने मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
-पुन्हा शेती तयार करण्यासाठी शेतांमध्ये दोन ते अडीच फूटापर्यंत धरणातील किंवा नदीचा गाळ टाकावा लागणार आहे. मातीचा भरावही करावा लागणार आहे. त्यामुळे पुरातून सावरायचे की शेती तयार करायची? अशा कात्रीत शेतकरी सापडले आहे.
इन्फो
पुरातून कसाबसा जीव वाचविता आला. फक्त अंगावरील कपडे तेवढे उरले आहे. आम्ही उघडे पडलो आहोत. पंचनाम्यांसोबतच आमची शेती पुन्हा तयार करण्यासाठीही मदत मिळणे जास्त गरजेचे आहे. जमिनीचे कागदपत्रेही पुरात वाहून गेली आहे.
-विश्वजीत दौलत बागूल, पूरग्रस्त शेतकरी, वाकडी ता. चाळीसगाव.
040921\04jal_5_04092021_12.jpg~040921\04jal_6_04092021_12.jpg
वाकडी ता. चाळीसगाव येथील विश्वजीत बागूल यांच्या शेतात आता दगड तेवढे उरले असून घरीही जमीनदोस्त झाले आहे. (छाया : जिजाबराव वाघ)~वाकडी ता. चाळीसगाव येथील विश्वजीत बागूल यांच्या शेतात आता दगड तेवढे उरले असून घरीही जमीनदोस्त झाले आहे. (छाया : जिजाबराव वाघ)