कासोद्यात अग्नीतांडव, १० घरे खाक, दहा कुटुंबांचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:22 IST2018-03-19T18:22:57+5:302018-03-19T18:22:57+5:30
कासोदा ता. एरंडोल येथे सोमवारी पहाटे अडीच वाजेनंतर जीन झोपडपट्टी या भागात अचानक आग लागून दहा घरे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दहा कुटुंब उघड्यावर आले आहेत.

कासोद्यात अग्नीतांडव, १० घरे खाक, दहा कुटुंबांचे लाखोंचे नुकसान
आॅनलाईन लोकमत
कासोदा, ता. एरंडोल : येथील जीन झोपडपट्टी या अत्यंत दाटीवाटीच्या भागात सोमवारी पहाटे (दि.१९) अडीच वाजेनंतर अचानक आग लागली. त्यात दहा कुटुंबांचे संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीतून या दहा कुटुंबांतील सदस्यांच्या अंगावरील कपडेच तेवढे शिल्लक राहिले आहेत. पहाटे पहाटेच घरांची राखरांगोळी झाल्याचे भयावह चित्र गावकऱ्यांना पहावे लागल्याने पिडीत कुटूंबांसह पहाणाºयांचेही काळीज पाणावले आहे.
आनंद आणि उत्साहाने साजरा झालेल्या गुढी पाडव्याच्या उत्तर रात्री गाढ झोपेत संपूर्ण गाव असतांना अचानक पळा, पळा, धावा असा एकच गोंधळ सुरू झाल्याने जो जागा झाला तो जीन झोपडपट्टी या आठवडे बाजाराशेजारील वस्तीकडे धावू लागला. गावातील सगळ्याच जाती धर्माच्या तरूणांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत, पण तोपर्यंत रुद्रावतार धारण केलेल्या आगीने दहा कुटूंबांच्या संसाराची राख रांगोळी करून टाकली होती. अग्नीशमन दलाचीही आग विझवण्यासाठी मदत झाली.
तलाठी कार्यालयाकडून पंचनामे
सोमवारी सकाळपासून तलाठी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यात सुमनबाई राजू केदार (८४,५००), सुनंदाबाई विठ्ठल पाटील (२ लाख, ५ हजार ) वंदना नाना भालसिंगे (१ लाख, २७ हजार ) इंदूबाई उत्तम भालसिंगे (९००००), सुभाष नथू सोनार (२,५५०००), रतन सोनवणे (९१५००), सोनजी सोनवणे (१ लाख,९०००) द्वारकाबाई हिलाल पाटील (७६०००), युवराज किसन पाटील (१,१९०००), देविदास रामदास ठाकरे (४७०००) असे मिळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या परिसरातील कुटूंब मोलमजूरी करून उपजिविका भागवतात. परिसरात शेकडो झोपड्या व घरे आहेत. सुदैवाने मोठ्या प्रमाणात तरूणांनी मदत केल्याने दहाच घरांवर संकट आले, नाही तर शेकडो घरे अतिशय दाटीवाटीने असल्याने मोठाच अनर्थ घडला असता. या परिसरात एखादी मोटारसायकलदेखील सरळ जाऊ शकत नाही तर पाण्याचा टँकर व इतर मदत मिळणे खूपच कठीण बाब आहे. सुमनबाई केदार या माजी ग्रामपंचायत सदस्येचे देखील घर जळून खाक झाले आहे. यातील एक आगग्रस्त सुभाष सोनार यांच्याकडे लग्न होऊ घातले आहे त्यामुळे या कुटूंबाने डाळ तांदूळसह संसारोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी केलेली होती. ती देखील खाक झाली आहे.
सततची पाणीटंचाई कामी आली
कासोदा गांवात गेल्या २० वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा पाणी संग्रह करण्याची सवय जडली आहे. प्रत्येकाच्या घरात कामाच्या वस्तूंपेक्षा पाण्याची भांडी जास्त असतात. त्यामुळे घराघरात मोठा पाणीसाठा असल्याने आग विझवण्यासाठी तो कामी आला. दरम्यान, परिसरात एक पालखी आलेली होती. पालखीच्या सेवेकरींसाठी एक टँकर पाणी भरून आणला होता त्याची देखील यावेळी खूप मदत झाली.