जळगावात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वृद्धेची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:54 IST2018-11-29T12:53:41+5:302018-11-29T12:54:43+5:30

निराधार योजनेचा लाभ मिळेना

Aged famine due to delayed administration of Jalgaon | जळगावात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वृद्धेची उपासमार

जळगावात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वृद्धेची उपासमार

ठळक मुद्दे जाब विचारण्यासाठी वृद्ेला ठेवले लिपिकाच्या टेबलावरकागदपत्रांची पूर्तता करा

जळगाव : घरात अन्नाचा एक कण नाही, साधा चहा पिण्यासाठी पैसे नाही, अशा बिकट परिस्थितीत असलेल्या भिकूबाई हेमलाल लोहार या ९५ वर्षीय वृद्धेचे निराधार योजनेचे अनुदान बंद झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून वृद्धेचे प्रचंड हाल होत आहे. हे अनुदान पुन्हा सुरू व्हावे म्हणून सबंधित कार्यालयात वारंवार चकरा मारूनही उपयोग होत नसून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या वृद्धेवर उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान, अधिकारी, कर्मचारी हे या महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख मंगला बारी यांनी या वृद्धेला थेट कार्यालात नेऊन तिला लिपिकाच्या टेबलावर ठेवले व दिरंगाईबाबत जाब विचारला.
शहरातील पांझरापोळ चौकानजीक असलेल्या बुनकरवाडीमध्ये भिकूबाई हेमलाल लोहार ही ९५ वर्षीय वृद्धा एकटीच राहते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत या वृद्धेला अनुदान मिळत असे व त्यावर तिचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वृद्धेचे अनुदान बंद झाल्याने तेव्हापासून ही वृद्धा हैराण झाली आहे. आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, या आशेवर वृद्धा जगत असून पोटाची खळगी भरण्यासाठी तिला इतरांकडे विनवण्या कराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नसल्याने सदर वृद्धेने मंगला बारी यांच्याकडे धाव घेतली व आपबिती सांगितली. त्या वेळी मंगला बारी यांनी रेल्वे स्थानकनजीक असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन वृद्धेबाबत माहिती दिली. चार महिन्यांपासून बारी या सदर कार्यालयाच्या चकरा मारत असून काहीही उपयोग झालेला नाही. अखेर कंटाळून त्यांनी सदर वृद्धेला सोबत घेऊन हे कार्यालय गाठले व वृद्धेला उचलून थेट कार्यालयातील लिपिकाच्या टेबलावर ठेवून वृद्धेचे हाल दाखविले.
कागदपत्रांची पूर्तता करा
गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत असताना केवळ उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या अधिकारी, कर्मचाºयांनी सदर वृद्धेच्या पासबुक तसेच आधार कार्डच्या झेरॉक्सची मागणी केली. एवढ्या दिवसांपासून चकरा मारत आहे, तेव्हा कागदपत्रे आठवले नाही आणि आता कागदपत्रे मागतात, तुमच्या या कारभारामुळे दोन वर्षापासून वृद्धेवर उपासमारीची वेळ आली, यास जबाबदार कोण, असा जाब मंगला बारी व भाजपाचे कार्यकर्ते किशोर वाघ यांनी कार्यालयात विचारला.
दिवाळी गेली अन्नाविना
जवळ एक पैसा नसल्याने घरात दररोज अन्नपाण्यासाठी वृद्धेचे हाल आहे. त्यात दिवाळी सणही अन्नाविना गेला, इतका गंभीर प्रसंग या वृद्धेवर ओढावला आहे.
चहासाठी पैसे नसलेल्या वृद्धेकडे तीन हजाराची मागणी !
सदर वृद्धेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यालयात काही जण तीन हजार रुपये मागत होते, असे सदर वृद्धेचे म्हणणे आहे. ज्या महिलेजवळ चहा घेण्यासाठी पैसे नाही, ती वृद्धा तीन हजार रुपये कोठून आणेल, असा सवाल बारी व वाघ यांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अनुदान प्रक्रिया आॅनलाईन झाल्यानंतर अनेकांचे बँक खात्याचे आयएफसीसी कोड नसल्याने अनुदान बंद झाले. सदर वृद्धेचा विषय माझ्यापर्यंत आला नाही.
- श्वेता संचेती, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना.

Web Title: Aged famine due to delayed administration of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव