विमा कालावधी संपल्यानंतर कृषी विभागाला आली केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग
By Ajay.patil | Updated: August 18, 2023 14:45 IST2023-08-18T14:44:43+5:302023-08-18T14:45:02+5:30
वर्षभर केळी असताना, ५० टक्के क्षेत्राची पडताळणी : ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा सूचना.

विमा कालावधी संपल्यानंतर कृषी विभागाला आली केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग
जळगाव - हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतंर्गत केळी लागवड नसताना, काही शेतकऱ्यांनी केळी लागवड केल्याचे दाखवत विमा काढला होता. याबाबत कृषी विभागाने काही महिन्यांपुर्वी चौकशीचे आदेश देऊन क्षेत्र पडताळणी केली होती. मात्र, तेव्हा कृषी विभाग व विमा कंपनीकडून पुर्ण पडताळणी झाली नाही. आता विमा कालावधी संपल्यानंतर मात्र कृषी विभाग व विमा कंपनीला केळीचे क्षेत्र पडताळणीची जाग आली आहे.
३१ जुलैपर्यंत पीक विम्याचा कालावधी असतो. हा कालावधी संपल्यानंतरच कृषी विभागाला केळीचे क्षेत्र पडताळणीचे जाग कशी आली ? असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच कृषी विभागाच्या या निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी कृषी विभागाकडून ही पडताळणी करणे गरजेचे होते. तेव्हा अपुर्ण क्षेत्राची पडताळणी केली. आता ज्यावेळी विमा कालावधी संपला आहे व विम्याची रक्कम देण्याची वेळ येत आहे. तेव्हाच कृषी विभाग व विमा कंपनीकडून क्षेत्र पडताळणी करण्याची जाग का आली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता पडताळणी करुन उपयोग काय..?
१. शेतकऱ्यांनी विमा काढला तेव्हा, विमा कंपनीने पीकांची पडताळणी न करताच विमा हप्ता का घेतला.
२. तेव्हाच विमा कंपनीला पीकाची पडताळणी करण्याचे शहाणपण का सुचले नाही ?
३. आता पीक पडताळणी केली तर त्या ठिकाणी केळीचे पीक राहील, याची शक्यता कमीच. कारण, बहुतांश शेतकऱ्यांची केळी कटाई झाली आहे.
४. आता अंदाजे पीक पडताळणी करून, शेतकऱ्यांचे नुकसान करून केवळ विमा कंपनीचाच फायदा होणार आहे.