नऊ वर्षानंतरही 80 किलोमीटरचे कामअर्धवटच
By Admin | Updated: May 25, 2017 17:00 IST2017-05-25T17:00:27+5:302017-05-25T17:00:27+5:30
सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग दुहेरीकरण

नऊ वर्षानंतरही 80 किलोमीटरचे कामअर्धवटच
>ऑनलाईन लोकमत/ रमाकांत पाटील
नंदुरबार, दि.25- पश्चिम रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या आदिवासी भागाला जोडणारा सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम प्रचंड प्रतीक्षेनंतर सुरू तर झाले पण हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने गेल्या नऊ वर्षात एकूण 306 किलोमीटरपैकी अद्यापर्पयत 225 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाने या मार्गासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्याने कामाचा वेग मंदावला आहे. दुसरीकडे या कामाचा खर्च वाढतच असल्याने हा मार्ग पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा व आदिवासी पट्टय़ातील विकासाला चालना देणारा सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग तयार होऊन 100 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. या मार्गाचे महत्त्व व त्यातून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता त्याचे दुहेरीकरण करण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून सुरू होती. 1992-93 मध्ये या मार्गाला मंजुरी देवून त्याकाळी सात कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. तथापि ऐनवेळी हा निधी कोकण रेल्वेकडे वळविल्याने हे काम मागे पडले. त्यानंतर या भागातील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा मागणीचा दबाव वाढला.
10 जानेवारी 2008 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्गाच्या दुहेरीकरणाला मंज़ुरी देण्यात आली. त्यानुसार उधना ते जळगाव या 306 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी 712 कोटी 60 लाख रुपये प्रकल्पाच्या किमतीला मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी पहिल्यांदा 2008-09 च्या रेल्वे अर्थसंकल्पात 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र हा निधी तेव्हा पुरेसा खर्च झाला होता. त्यानंतर पुढील वर्षातही जेमतेम 30 कोटींची तरतूद दरवर्षी होत राहिली. वास्तविक या मार्गाचे काम पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, पुरेसा निधी मिळाला नसल्याने काम रेंगाळले त्यामुळे रस्त्याच्या कामाची किंमतही सुमारे 500 कोटींनी वाढली आहे. सद्यस्थितीत व्यारा ते सोनगड व सोनगड ते चिंचपाडार्पयतचे काम पूर्ण झाले आहे. धरणगाव ते बेटावदर्पयतचे दुहेरीकरणाचे काम झाले आहे. अमळनेर ते होळ या मार्गाचे कामही पूर्ण होऊन त्याचे इन्स्पेक्शन नुकतेच करण्यात आले. महिनाभरात या मार्गावरील वाहतूकही सुरू होईल. तथापि, चलठाण ते उधना, होळ ते नंदुरबार आणि पाळधी ते जळगाव या तीन टप्प्यातील जवळपास 80 किलोमीटरपेक्षा अधिक कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या कामांसाठी निधी मिळाल्यास कामाला गती मिळू शकेल. यापूर्वीच या प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढला आहे. अजून विलंब झाल्यास खर्च वाढेल. त्यामुळे या कामाला आता गती देऊन किमान मार्च 2018 र्पयत हा रेल्वेमार्ग एकदाचा पूर्ण दुहेरी करावा, अशी अपेक्षा आहे.