‘त्या’ पाच नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी वकीलांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:05 IST2019-11-05T12:04:51+5:302019-11-05T12:05:24+5:30
कारवाई होण्याची शक्यता ? : घरकुल प्रकरणात झाली शिक्षा

‘त्या’ पाच नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी वकीलांचा सल्ला
जळगाव : घरकुल प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत मनपा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत मनपा प्रशासनाने सोमवारी काही विधी तज्ज्ञांकडून सल्ला मागविला असल्याची माहिती मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.
घरकुल प्रकरणात एकूण ४८ आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान पाच नगरसेवकांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे गटनेते भगत बालाणी, दत्तात्रय कोळी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. पाचपैकी चार नगरसेवक सध्या जामीनावर आहेत. लता भोईटे या अद्याप कारागृहातच आहेत. घरकुल प्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यामुळे विद्यमान नगरसेवकांविरूध्द काय कारवाई केली याचा जाब माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी माहिती अधिकारात विचारला होता. यासंदर्भात अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून हालचालींना गती मिळाली आहे. मनपाने तातडीने पत्राचा आधार घेत विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागवला आहे. या प्रकरणात कायदेशिररित्या काय कारवाई करता येईल याबाबत विचारणा केली आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून शिक्षेला दोन महिने उलटूनही स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांविरूध्द अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरसेवकांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.