अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून पो. कॉ. लोहार यांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:42+5:302021-09-17T04:21:42+5:30
रावेर : ‘पोलीस दादा देवदूत बनून धावून येतो तेव्हा...!’ याबाबत ‘लोकमत’ने दि. १३ सप्टेंबर रोजी सर्वप्रथम प्रसिद्ध ...

अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून पो. कॉ. लोहार यांचे कौतुक
रावेर : ‘पोलीस दादा देवदूत बनून धावून येतो तेव्हा...!’ याबाबत ‘लोकमत’ने दि. १३ सप्टेंबर रोजी सर्वप्रथम प्रसिद्ध केलेल्या ठळक वृत्ताची राज्याचे विशेष मोहिमेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. के. वेंकटेशम् यांनी दखल घेतली आहे. रावेर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल नीलेश लोहार यांचे ट्विटरद्वारे ट्विट करून कौतुक केले आहे. किंबहुना, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनीही पोलीस कॉन्स्टेबल लोहार यांना बक्षीस घोषित केले असून, रावेर पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव मागविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंप्री येथील विवाहिता व तिची सासू या रावेर येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या दालनातून ढसाढसा रडत १२ दिवसांच्या अत्यावस्थेतील बाळाला हातात घेऊन परतत असताना, त्यांच्या पाठोपाठ असलेल्या नंबरवरून डॉक्टरांच्या दालनात स्वतःच्या मुलाची प्रकृती दाखविण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबल लोहार यांच्या खाकीतील हृदय मानवता धर्मातून हेलावून सुटले. म्हणून न्यूमोनियासदृश आजाराने १२ दिवसांच्या बाळाची चिंताजनक प्रकृती पाहून लोहार यांनी पत्नीला मुलासह रिक्षाने घरी पाठवून स्वतःच्या कारमध्ये त्या बाळासह त्याच्या माता व आजीला बर्हाणपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने त्या बालकाला जीवदान मिळाले होते.
याबाबतचे ठळक वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. के. वेंकटेशम् यांनी पोलीस कॉन्स्टेबल लोहार यांचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, उत्कृष्ट अधिकारी हा त्यांच्या पदाने नव्हे, तर कर्तृत्वाने ओळखला जातो. हाकेच्या पलीकडे जाऊन आपण कर्तव्य बजाविल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल नीलेश लोहार आपला सार्थ अभिमान आहे.